Latest

प्रबोधनकार ठाकरे : महाराष्ट्राच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास

Arun Patil

प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे यांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रमाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल.

'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी शंभर वर्षांपूर्वी 'प्रबोधन' नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. या शताब्दीच्या निमित्तानं 'प्रबोधन'मधील प्रबोधनकारांच्या लेखांचा त्रिखंडात्मक ग्रंथ 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'नं नुकताच प्रकाशित केला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं संपादन सचिन परब यांनी केलं. खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री अशी आहे.

प्रबोधनकारांच्या संस्कारात, तालमीतच बाळासाहेब ठाकरे लहानाचे मोठे झाले. इतकंच नव्हे, तर शिवसेना स्थापन करण्यामागची प्रेरणा बाळासाहेबांना प्रबोधनकारांकडूनच मिळाली होती. सचिन परब हे गेली कित्येक वर्षं सातत्यानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं 'रिंगण' नावाचा अंक प्रकाशित करतात, त्याद‍ृष्टीनं त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. विशेष म्हणजे, दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंवर वेबसाईट स्वतः पुढाकार घेऊन केली होती.

तेव्हापासून त्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी संपादित केलेलं हे काम एक प्रकारचा कलशाध्यायच म्हणावा लागेल. कारण, 'प्रबोधन'चे अंक वाचकांसाठी कुठं उपलब्ध नव्हते. हे अत्यंत दुर्मीळ असे अंक सचिन परब यांनी मिळवले. या अंकातील प्रबोधनकारांचे लेख या त्रिखंडात समाविष्ट करण्यात आले आहेत. या खंडाचं नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

अत्यंत परखड, स्पष्ट वक्‍ते, निर्भीड, निस्पृह पत्रकार अशी प्रबोधनकारांची महाराष्ट्राला ओळख आहे. समोरचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे, याचा विचार न करता सत्याचा पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे, असं समजून प्रबोधनकारांनी लेखन केलं. भाषणं केली. त्यांचं व्यक्‍तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते नट होते. दिग्दर्शक होते. नाटककार होते. संशोधक होते.

इतिहास संशोधक होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वक्‍तृत्वशास्त्रावरील पुस्तकानं झाली. हे पुस्तक मुद्रणालयात छापलं जात असताना काही कारणानिमित्त लोकमान्य तिथं आले होते. त्यांच्या नजरेस हे पुस्तक पडलं. त्यांनी ते चाळलं. तेव्हा प्रबोधनकार विशीच्या आसपास होते. या पुस्तकाचं कौतुक लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यानंतरचं प्रबोधनकारांचं महत्त्वाचं काम वि. का. राजवाडे यांच्या संदर्भानं सांगता येतं. वि. का. राजवाडे यांनी केलेल्या संशोधनाचं महत्त्व खुद्ध प्रबोधनकारांनाच माहीत होतं. राजवाडे गेल्यानंतर प्रबोधनकारांनी लिहिलेल्या मृत्युलेखात राजवाड्यांच्या कामाचा यथोचित गुणगौरव केला आहे.

पुढचा राजवाडे जन्माला येण्यासाठी काही शतकं लागतील, असं त्यांनी म्हटलं होतं. गुणगौरव केला, तशी राजवाड्यांवर टीकाही त्यांनी केली. राजवाडे चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामध्ये काही जातींचा अधिक्षेप कारण नसताना झाला, तेव्हा मात्र प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या संशोधनाची अक्षरशः चिरफाड केली. तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या आपल्या जातीचा किल्ला एकहाती लढवला. त्यांच्या या कामाचं मोल फार आहे. त्यांची ही कीर्ती राजर्षी शाहू महाराजांपर्यंत पोहोचली. मग शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावून घेतलं.

शाहू महाराज अनेक बाबतींमध्ये प्रबोधनकारांना सल्ला देत. नंतरच्या काळात त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला. 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, 'जागृती'कार भगवंतराव पाळेकर, श्रीपतराव शिंदे अशी किती तरी नावं सांगता येतील. त्याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' सुरू केलं होतं. मुकुंदराव पाटील यांचं 'दीनमित्र' हे वर्तमानपत्रही चालायचं. त्याच काळात जहाल पत्रकार म्हणून ओळख असलेले दिनकरराव जवळकर हेही उदयाला येत होते. 'प्रबोधन'मध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार होता.

आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं त्यांनी 'प्रबोधन' हे पत्र चालवलं. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादाचं अधिष्ठान लाभलं. ते देण्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं योगदान फार आहे. ब्राह्मणांच्या देवांऐवजी आपल्या देवांची स्थापना करा किंवा त्यांच्या धर्मइतिहासाऐवजी आपला धर्मइतिहास लिहा, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ते अडकले नाहीत. त्यापुढं जाऊन हिंदू धर्मासह एकूणच धर्मसंस्थेतल्या उणिवांवर प्रहार केले. धर्मात असलेल्या मध्यस्थावर कडाडून प्रहार केले.

त्या काळातल्या महाराष्ट्राचं वर्णन 'प्रबोधनयुग' असं केलं जातं. प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून प्रबोधनकारांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रमाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल.

बर्‍याच लोकांना वाटायचं की, राजर्षी शाहू महाराज यांच्या गुडबुक्समध्ये प्रबोधनकार आहेत. याचा अर्थ शाहू महाराजांची प्रत्येक गोष्ट प्रबोधनकारांना मान्य होती, असं नाही. ज्या वेळेला प्रबोधनकारांनी आपलं विरोधी मत दर्शवलं त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांच्या मताचा आदरच केला आहे. माझ्या द‍ृष्टीनं महाराष्ट्रातली ही फार महत्त्वाची जोडी होती. दुसरी जोडी अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची. कर्मवीरांसाठी प्रबोधनकार हे गुरुतुल्य स्नेही होते. कर्मवीरांमुळंच प्रबोधनकारांनी मुंबईत सुरू केलेलं 'प्रबोधन' सातार्‍याला न्यायचं ठरवलं.

पुढं त्यांनी 'खरा ब्राह्मण' नावाचं नाटक लिहिलं. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित हे नाटक होतं. त्याचे खूप प्रयोग झाले. हे नाटक गाजलंही. आपल्या जातीवर टीका आहे, म्हणून काहीजणांनी कोर्टात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. प्रबोधनकारांनी गाडगे महाराजांचं, रंगो बापूजींचं चरित्रही लिहिलं. 1857 च्या उठावात रंगो बापूजींचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं चरित्र लिहावं, अशी शाहू महाराजांची इच्छा होती.

प्रबोधनकारांनी ते लिहून शाहू महाराजांची इच्छा पूर्ण केली. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 'शेतकर्‍यांचे स्वराज्य' लिहिलं. पुढं संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांच्या बैठका प्रबोधनकारांच्या घरीच होत. त्यात श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी असे अनेक मोठमोठे लोक होते. या सगळ्या बैठकांमधूनच चळवळीनं आकार घेतला, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे.

त्या अर्थानं प्रबोधनकारांनी कोणती संघटना बांधली नाही. त्यांनी स्वतःचा असा अनुयायी वर्ग केला नाही. त्यामुळं एरव्ही त्यांच्या विचारांचा तितका गौरव होेऊ शकला नाही. वास्तविक, त्यांनी केलेल्या कामाला श्रेय हे मिळायलाच हवं होतं. परंतु, इतिहास कधी तरी न्यायाधीश होतो आणि होऊन गेलेल्या लोकांचं मूल्यमापन करतो. त्याला काव्यगत न्याय म्हणायलाही हरकत नाही. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले हे तीन खंड या द‍ृष्टीनं महत्त्वाचे आहेत.

हे काम सचिन परब यांच्या हातून झालं, याचं समाधान आहे. यापुढंही अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून होवो, अशी मी सदिच्छा देतो. सचिन परब यांच्या संपादनाचं वैशिष्ट्य सांगायलाच हवं. ते म्हणजे 'प्रबोधन'चा धावता आढावा घेणारा समीक्षणात्मक लेख प्रस्तावनेच्या रूपानं त्यांनी लिहिला आहे. प्रबोधनकारांच्या कामाला त्यांनी किती उचित न्याय दिला आहे, हे या प्रस्तावनेतून आपल्याला समजतं.

या खंडाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व अन्य मंडळी उपस्थित होती. त्यावेळी प्रबोधनकारांचं वाङ्मय इंग्रजी भाषेत उपलब्ध झालं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा थोरात यांनी मांडला. या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहू, असं भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. त्याद‍ृष्टीनं हे सगळं साहित्य इंग्रजीत येणं ही गोष्टही महत्त्वाची आहे.

या खंडांचं वाचकांच्या द‍ृष्टीनं मोल काय आहे, तेही थोडक्यात सांगता येईल. एक तर महाराष्ट्राच्या इतिहासाची महत्त्वाची बाजू जी एरव्ही मुख्य प्रवाहात येत नाही, ती समजून घेण्यासाठी हे खंड वाचण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की, 1920 ते 1930 हे दशक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं एक केऑस आहे. नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं महाराष्ट्र या काळात चाचपडत होता. कारण, दोन महत्त्वाचे नेते एक राष्ट्रवादी लोकांचे नेते लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर पक्षाची बाजू लढवणारे शाहू महाराज दशकाच्या सुरुवातीलाच कालवश झाले होते.

त्यामुळं त्यांच्या अनुयायांसमोर चांगला नेता नव्हता. या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढं येऊन महाराष्ट्रासमोरची वैचारिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याद‍ृष्टीनं या त्रिखंडात्मक ग्रंथाचं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रबोधनकारांचं या खंडात दडलेलं विचारधन वाचणं आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT