Latest

प्रदूषणामुळे आयुष्य घटणार तर उत्तर भारताला मोठा धोका

अमृता चौगुले

नवी दिल्‍ली, वृत्तसंस्था : प्रदूषणाची पातळी आजच्याइतकीच राहिली तर उत्तर भारतातील तब्बल 51 कोटी लोकांचे आयुष्य 7.6 वर्षांनी घटणार आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेच्या (ईपीआयसी) एअर क्‍वालिटी लाईफ इंडेक्समधून (एक्यूएलआय) हा धोका व्यक्‍त झाला आहे.

या विद्यापीठाकडून भारतासह जगातील प्रदूषणाचा अभ्यास केला जातो. विद्यापीठाच्या ताज्या अहवालानुसार जगातील 44 टक्के प्रदूषणवाढीस 2013 सालापासून भारत कारणीभूत आहे. 1998 पासून भारताच्या वार्षिक प्रदूषणात तब्बल 614 टक्क्यांची वाढ झाली असल्याचा आरसा या अभ्यासातून दाखविला गेला आहे. डब्ल्यूएचओने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषणाच्या क्षेत्रात भारतातील 1.3 अब्ज लोक राहतात, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

खुद्द भारताने घालून दिलेल्या मानकापेक्षाजास्त प्रदूषणाच्या क्षेत्रात 63 टक्के लोक राहतात. सर्व भारतीयांचे आयुष्य प्रदूषणामुळे पाच वर्षांनी कमी होते, हे ताज्या एक्यूएलआय विश्‍लेषणातून सिद्ध झाले आहे. मात्र, प्रदूषण कायम राहिले तर उत्तर भारताच्या पठारावरील 510 दशलक्ष किंवा देशाच्या लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकांचे आयुष्य 7.6 वर्षांनी घटण्याची शक्यता आहे. भारतात बाल आणि माता कुपोषणामुळे आयुर्मान 1.8 वर्षाने घटते, तर धूम्रपानामुळे ते 1.5 वर्षाने घटते, असे निरीक्षण या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे

… तर 10 वर्षांनी वाढेल आयुष्य

बांग्लादेशनंतर भारत हाच जगातील दुसर्‍या क्रमांकाचा अतिप्रदूषित देश आहे. देशाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त वायू प्रदूषण आहे. देशच्या राजधानीत तर प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान 10 वर्षांनी घटले आहे. दिल्‍लीतील प्रदूषणाची पातळी प्रति क्युबिक मीटर पाच मायक्रोग्रामने घटली, तर तेथील लोकांचे आयुर्मान 10 वर्षांनी वाढेल. जगाच्या तुलनेत प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम दक्षिण आशियावर होत आहे, जेथे एकूण लोकसंख्येच्या निम्मे लोक राहतात, असे या अभ्यासात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT