Latest

प्रत्येक क्षण देशसेवेची गॅरंटी

Arun Patil

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीला नेतृत्व, द़ृष्टिकोन नाही. पण सत्ता मात्र हवी आहे. भाजपचे तसे नाही. आपला प्रत्येक क्षण देशाच्या सेवेसाठी, हीच गॅरंटी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूरमधील अरमने मैदानावर त्यांनी शनिवारी (दि. 20) जाहीर सभा घेतल्या. भाजप उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला. केवळ सत्तेच्या आशेने काँग्रेससह काही पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये सहभागी पक्षांनी आपले भविष्य काय, याचा विचारच केला नाही. भविष्यातील योजना, देशाला कुठे पोहोचवणार, याचा द़ृष्टिकोन ठेवला नसल्याची टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान योजना जारी केली. या अंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येत आहेत; तर राज्य सरकारांनी यामध्ये 4 हजार रुपये द्यायचे आहेत. पण, कर्नाटक सरकारने ही योजनाच बंद केली आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, यापेक्षा आणखी काय पुरावा हवा आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा चिक्कबळ्ळापुरात सभा घेतली. उमेदवार डॉ. के. सुधाकर, कोलारचे निजद उमेदवार मल्लेश बाबू यांचा प्रचार केला. तेथून बंगळुरातील अरमने मैदानावर आयोजित सभेत त्यांनी बंगळूर उत्तरच्या उमेदवार शोभा करंदलाजे, बंगळूर दक्षिणचे उमेदवार तेजस्वी सूर्या, बंगळूर मध्यचे उमेदवार पी. सी. मोहन यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या

माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसने पाच हमी योजना राबवल्या आहेत. केंद्रात सत्तेवर आल्यास 25 हमी योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. पण त्यांनी आपले नेतृत्व कोण आहे, हे ठामपणे सांगितलेले नाही. तशी हिम्मत त्यांच्यात नाही. पण गेल्या दहा वर्षांत मोदींनी देशात अनेक योजना राबवून जगाच्या नकाशावर भारत ठळकपणे दिसेल, अशी कामगिरी केली.

SCROLL FOR NEXT