सॅन जुआन : रशियाशी झुंजत असलेल्या युक्रेनचा शेजारचा देश पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का 'मिस वर्ल्ड 2021' ठरली आहे. प्युर्तो रिकोमध्ये आयोजित 70 व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत तिने जगतसुंदरीचा किताब पटकावला.
'मिस वर्ल्ड' हँडलने ट्विट करून सांगितले की, आमची 'मिस वर्ल्ड 2021' पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का ही आहे. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील 40 सुंदरींनी सहभाग घेतला. त्यामध्ये अमेरिकेची अप श्री सैनी ही फर्स्ट रनर अप, तर पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टची ओलिव्हिया येस सेकंड रनर अप ठरली. 2019 ची विजेती टोनी एन. सिंह हिने कॅरोलिनाच्या डोक्यावर मुकुट ठेवला. भारताची मानसा वाराणसी या स्पर्धेत 'टॉप 13'पर्यंतच मजल मारू शकली. मात्र, तिला 'टॉप 6'मध्ये जागा मिळवता आली नाही. हैदराबादमध्ये जन्मलेली मानसा वडिलांच्या नोकरीमुळे छोट्या वयातच कुटुंबीयांसमवेत मलेशियाला शिफ्ट झाली होती.
तिने ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ती भारतात परतली आणि हैदराबादच्या वसावी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी संपादन केली. 2020 मध्ये तिने तेलंगणाकडून 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत सहभाग घेतला होता व त्यामध्ये ती विजेती ठरली होती. तिला 2020 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुटही मिळाला. यापूर्वी 2017 मध्ये मानुषी छिल्लर 'मिस वर्ल्ड' ठरली होती. आतापर्यंत सहा भारतीय सुंदरींना 'मिस वर्ल्ड' हा किताब मिळालेला आहे. पोलंडची कॅरोलिना ही सध्या मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्रीचे शिक्षण घेत असून, तिला पीएच.डी. करायची आहे. पोहणे, स्कुबा डायव्हिंग, टेनिस, बॅडमिंटनमध्ये तिला रस आहे. कॅरोलिनाची संस्था 'हिज ब्यूटी विद ए पर्पज प्रोजेक्ट' बेघर लोकांना मदत करते. ती दर रविवारी सुमारे 300 बेघर लोकांना भोजन व वैद्यकीय मदत देते.