Latest

पॉझिटिव्ह पे सिस्टीम नेमकी आहे तरी काय?

Arun Patil

येत्या सप्टेंबरपासून बहुतांश बँका धनादेशाच्या व्यवहारातील नवा बदल लागू करत आहेत. एसबीआय, एचडीएफसी, आयसीसीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी यासारख्या अन्य बँकांनी सध्या ऐच्छिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र भविष्यात धनादेशाच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वच बँकांकडून सरसकट 'पॉझिटिव्ह पे' सिस्टीम लागू होण्याची शक्यता आहे.

पाॅझिटिव्ह पे : चेक क्लिअरिंग प्रक्रियेतील फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे पद्धत अमलात आणली आहे. या नव्या रचनेनुसार 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा धनादेश असेल, तर त्यासाठी खातेदार आणि प्राप्तकर्ता याची संपूर्ण माहिती सादर करण्याची गरज भासू शकते. बँकांकडून मोठ्या व्यवहारासाठी म्हणजेच सहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्याबाबत विचार केला जात आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टीम या नवीन प्रणालीची माहिती ग्राहकांना द्यावी, अशी सूचना आरबीआयने सर्व बँकांना दिली आहे. यासाठी सर्व चॅनलच्या वापर करावा, असा सल्ला दिला आहे. यानुसार खातेदाराला धनादेशाचा क्रमांक, धनादेश वटवणार्‍यांचे नाव, रक्कम, तारीख आदींची माहिती द्यावी लागेल. अन्यथा खात्यात शिल्लक असेल तरीही या मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा धनादेश वटणार नाही.

पॉझिटिव्ह पे लिमिट : 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश जारी करणार्‍या सर्व खातेधारकांसाठी ही सुविधा सुरू करावी, अशी सूचना बँकांना देण्यात आली आहे. अर्थात खातेधारकांसाठी ही सुविधा ऐच्छिक असेल. परंतु धनादेशातील गैरव्यवहार रोखण्यासाठी बँक आता 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या धनादेशासाठी ही पद्धत सरसकट लागू करण्याचा विचार करत आहे. बँक अधिकार्‍यांच्या मते, आरबीआयने मंजुरी दिल्यास 2023 आर्थिक वर्षात ही सिस्टीम सर्व बँकांत लागू होऊ शकते.

खास वैशिष्ट्ये

काही बँकांकडून धनादेशच्या नव्या सिस्टीमबाबत आगावू सूचना दिली जात आहे. अधिक रकमेचा धनादेश असल्यास आणि त्याचे विवरण नोंदवलेले नसेल तर धनादेश स्वीकारला जाणार नाही, अशी सूचना खातेधारकांना दिली जात आहे.

मोठ्या रकमेचा धनादेश वटवताना होणार्‍या अडचणींपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. बँकेने मागितलेली माहिती निर्धारीत वेळेत आपण जमा केली आहे की नाही, याचे आकलन करावे. आपण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा धनादेशाने व्यवहार करत असाल तरीही बँकेकडे माहिती देणे अनिवार्य आहे.

आरबीआयने म्हटले की, 'डिस्प्यूट रिझोल्यूशन मॅकेनिज्म'नुसार केवळ पॉझिटिव्ह पे सिस्टीममध्ये नोंदणीकृत धनादेशच स्वीकारले जातील. ग्राहकांना मोबाईलवर धनादेश स्वीकारल्याचा संदेश येईल. त्याचवेळी तो नामंजूर केला असेल तर त्याचे कारणही एसएमएसद्वारे समजेल.

50 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा धनादेश जारी करत असाल, तर संबंधित बँकेत पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू आहे की नाही, याची चौकशी करावी. ही सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे.

देशातील मोठ्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका या सुविधांची माहिती ग्राहकांना देत आहेत. स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, यस बँक, आयडीबीआय बँक आणि अन्य बँकांनी अगोदरच पॉझिटिव्ह पे सिस्टीमची माहिती ग्राहकांना पुरवली आहे.

पॉझिटिव्ह पे ची प्रक्रिया

या प्रक्रियेनुसार धनादेश देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती हा एसएमएस, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम आदी चॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक रूपातील धनादेशाची मूलभूत माहिती (तारीख/लाभार्थीचे नाव/रक्कम आदी) बँकेला देईल. बँकेकडे असलेल्या विवरणाची सीटीएस प्रणालीकडून आलेल्या धनादेशच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. काही विसंगती आढळल्यास सीटीएसकडून बँकेला सूचना दिली जाईल. त्यानंतर त्यावर तोडगा काढला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT