Latest

पैसे मुंबईत कमवायचे अन् मराठी पाट्यांना विरोध करायचा, हे चालणार नाही : अजित पवार

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पैसे मुंबईत कमवायचे. ते आपल्या राज्यात पाठवायचे आणि मराठी पाट्या लावण्यास येथे विरोध करायचा. हे चालणार नाही. कधी झटका बसला तर मग बोलू नका, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राज्यातील परप्रांतीयांना दिला.

मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, काही शहाणे मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले होते. पण मराठीत पाट्या ग्राहकांच्या सोयीसाठी लावण्याचा निर्णय योग्य आहे, अशी चपराक न्यायालयाने दिली. महाराष्ट्रात राहायचे आणि मराठी माणूस आणि भाषेला विरोध करायचा, हे चालणार नाही. मराठीचा द्वेष करू नका. सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. पण वेगळे वागू नका, असे पवार यांनी बजावले.

सनदी अधिकार्‍यांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे. आपल्या कुटुंबीयांनीही मराठी भाषा शिकली पाहिजे, असा सल्ला देताना उपमुख्यमंत्र्यांनी सनदी अधिकारी भूषण गगराणी यांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, आमचे सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी मराठीतून आयएएसची परीक्षा दिली होती. त्यात ते देशात तिसरे आले होते. त्यामुळे मराठीचा न्यूनगंड बाळगू नका. मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आहेत. पण त्यांची डॉक्टर पदवी संशोधनाची आहे. त्यांनी आपल्या नावापुढे डॉक्टर इंग्रजीत लिहिले. त्यांनी विद्यावाचस्पती असे लिहिले पाहिजे, अशी मार्मिक टिप्पणी पवार यांनी केली.

केवळ बोलून संवर्धन नाही

भाषा हे संस्कृतीचे प्रवाही रूप आहे. भाषा प्रवाही असली पाहिजे. त्यासाठी इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घ्यावे लागेल. ती मानसिकताही तयार करावी लागेल. केवळ एकमेकांशी मराठीत बोलण्याने मराठी भाषेचे संवर्धन होईल. हीसुद्धा एक भाबडी आशा आहे. मात्र हे सर्व करत एक ठोस कृती कार्यक्रम तयार करावा लागेल.

केवळ सरकारवर सगळे सोडून चालणार नाही. समाज म्हणून प्रत्येकाने यामध्ये सक्रिय सहभाग दिला पाहिजे, असे भाष्यही अजित पवार यांनी केले. ते म्हणाले, कोणतीही भाषा नुसती ओठातून येऊन उपयोग नाही तर ती पोटातून आली पाहिजे. कोणतीही भाषा टिकायची असेल तर ती भाषा बोलणार्‍याचे पोट भरण्याचे सामर्थ्य त्या भाषेत असणे आवश्यक असते. त्यासाठी ती उद्योगाची, रोजगाराची भाषा असणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही उद्योगाची व्हावी, यासाठी शासनाबरोबरच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT