Latest

पेरणी घटल्याने ज्वारी होणार महाग; ज्वारीच्या सरासरी क्षेत्रापैकी ६४.६८ टक्के पेरणी

दिनेश चोरगे

कुंभारी; इरण्णा गंचिनगोटे :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर, भंडारकवठे, बाळगी, कंदलगाव, कुंभारी, वांगी परिसरातील रब्बी ज्वारीचा पेरा कमालीचा घटला आहे. ज्वारीचे उत्पादन अधिक प्रमाणात घेणाऱ्या तालुक्यातच शेतकऱ्यांना ज्वारीची वानवा भासणार आहे. त्यामुळे नागरिक आतापासूनच वर्षभर पुरेल एवढ्या ज्वारीची खरेदी करत आहेत. त्यामुळे ज्वारीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरिबांची भाकरी आगामी काळात आणखी महाग होणार आहे.

दक्षिण तालुक्यात ज्वारीचे पेरणीचे सरासरी क्षेत्र २४ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र असताना त्यापैकी १५ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीची सरासरी ६४.६८ टक्के पेरणी, गहू १५०.५० टक्के, हरभरा १२८ टक्के पेरणी झाली आहे. बाजारात गव्हापेक्षा ज्वारी महाग झाल्याने सर्वसामान्य व कष्टकऱ्यांची भाकरी महाग झाली आहे. किरकोळ बाजारात ज्वारी ५० रुपये किलो या भावाने विक्री होत आहे. ज्वारीच्या तुलनेत गहू ३५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. यापूर्वी उलट स्थिती होती. गहू महाग असायचे, तर ज्वारी स्वस्त असायची. आता उलट आहे. परिस्थिती झाली आहे. ज्वारी हे दक्षिण तालुक्याचे प्रमुख पीक आहे. ज्वारीची भाकरी ग्रामीण भागाची खरी ओळख आहे; परंतु ही भाकरी गोरगरिबांना आता न परवडणारी झाली आहे. आजघडीला . शेतकऱ्यांचा जास्त कल बाजारात जास्त किंमत असणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे दिसून येत आहे.

सोयाबीन, उडीद, भुईमूग, ऊस, फळबाग, हरभरा आदींच्या पीक पेऱ्यात वाढ झाली आहे. त्या उलट ज्वारीच्या पेयात मात्र घट झाली आहे. बाजारात जास्तीची किंमत येणाऱ्या पिकांची लागवड करण्यात शेतकरी उत्सुक असल्याने दिसून येत आहे. या पिकांना बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी अशाच पिकांची लागवड करीत आहे. ज्वारीचा पेरा घटल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ज्वारीच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे गरिबांच्या हक्काची भाकरी महाग होणार आहे. उत्पादन वाढीसाठी पीक पद्धतीमध्ये बदल करणे हा चांगला प्रयोग असला तरी या बदलाबरोबर बाजारपेठांचा अभ्यास होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्वारीचे दर आणि पेरणीपासून काढणीपर्यंत करावे लागणारे परिश्रम यामुळे दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी या मुख्य पिकाला बाजूला सारून हरभरा, गहू, भुईमूग, ऊस, फळबाग पिकांवर भर दिला आहे.

शेतीमध्ये पाखरांचे हवेच्या थवे येऊन ज्वारीचे पीक हुरडा अवस्थेत आल्यानंतर कणसावर तुटून पडतात. पाखरांना हाकलल्यानंतर बाजूच्या उसामध्ये जाऊन लपून बसतात. पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा हे पक्षी ज्वारी खाऊ लागतात. त्यामुळे उत्पादनात बरीच घट निर्माण होते. या कारणाने शेतकरी ज्वारी पेरण्यास उत्सुक राहिले नाहीत.
चंद्रकांत मळेवाडी, शेतकरी, कुंभारी

SCROLL FOR NEXT