Latest

पुतळे अनावरण सोहळ्यास 70 हजार नागरिक राहणार उपस्थित : मंत्री मुश्रीफ

Arun Patil

कागल ; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा अनावरणाच्या समतेच्या जागराच्या कार्यक्रमाला सुमारे 60 ते 70 हजार लोक उपस्थित राहतील. या समतेच्या जागराला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हा कार्यक्रम येथे शनिवारी (दि. 4) सायंकाळी चार वाजता नवीन आरटीओ चेक पोस्ट नाका येथे होणार आहे.

ना. मुश्रीफ म्हणाले, पुतळा अनावरण कार्यक्रमाची टॅगलाईन 'जागर समतेचा' अशी केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतराच्या कामाचा प्रारंभ येत्या जयंतीपासून करण्याचा आपला संकल्प आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही निवडणुकीपूर्वी केले जाणार आहे.

नगरपालिका निवडणुकीनंतर स्व. सदाशिवराव मंडलिक, स्व. विक्रमसिंह घाटगे आणि स्व. श्रीमंत अजितसिंह घाटगे यांचे पुतळे उभा करण्याची जागा निश्चित केली आहे. या कामाचा प्रारंभही लवकरच केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात कागल शहर हे पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल. या पुतळ्यांची संरक्षण आणि जतन पालिका करणार आहे.

या महामानवांच्या पुतळ्यापासून आदर्श आणि प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मुश्रीफ म्हणाले, या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमाचे नियोजन युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रवीणसिंह पाटील, प्रकाश गाडेकर आदी करीत आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते, बहुजन चळवळीतील नेते उपस्थित राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT