Latest

पुणे विद्यापीठात साकारणार खाशाबा जाधव यांचे शिल्प

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्‍तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पूर्णाकृती शिल्प साकारण्यात येणार आहे. त्याद‍ृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, येत्या महिनाभरात त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या क्रीडा संकुलालाही खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतासाठी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला होता. त्यांच्या या कार्याची दखल, तसेच भावी खेळाडूंना त्यांचे शिल्प प्रेरणादायी ठरावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे हे पूर्णाकृती शिल्प ब्राँझ धातूत असेल. सुमारे पाचशे किलो वजनाचे हे शिल्प असणार आहे. सध्या त्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभीकरण, तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्‍कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यापीठाला देण्यात आली आहे.

व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठातील भव्य क्रीडा संकुलास कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले आहे; तसेच भावी क्रीडापटूंना प्रेरणादायी ठरेल, असे त्यांचे पूर्णाकृती शिल्प संकुलात उभारण्यात येत आहे. आगामी एक महिन्यात संबंधित काम पूर्ण होणार आहे.
– डॉ. प्रफुल्‍ल पवार,
कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT