Latest

पुणे : पश्‍चिम घाटातील जैवविविधतेत ‘टार्डिग्रेड’ची भर

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : अतिउच्च तापमानात तसेच अतिथंड वातावरणात अनेक वर्षे सुप्‍त अवस्थेत जिवंत राहणार्‍या गोड्या पाण्यातील 'टार्डिग्रेड' या सूक्ष्मजीवाचा शोध लावण्यात व त्यावर मूलभूत अभ्यास करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाला यश आले आहे. भविष्यात या 'टार्डिग्रेड'चा उपयोग अंतराळातील संशोधनात होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

विभागातील संशोधक कल्याणी भाकरे व प्राध्यापक डॉ. कल्पना पै यांनी 'अ‍ॅक्‍वाटिक इकॉलॉजी' या रिसर्च जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.

अधिक माहिती देताना पै म्हणाल्या, 'टार्डिग्रेड'ला 'वॉटर बेअर' या नावानेही संबोधले जाते. 'टार्डिग्रेड'ची भारतात सर्वात आधी नोंद विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती. तेव्हापासून यावर दीर्घकालीन अभ्यास झाला नव्हता. या आधीही जमिनीवर 'टार्डिग्रेड' आढळले होते. मात्र, गोड्या पाण्यातील 'टार्डिग्रेड' हे या अभ्यासादरम्यान आढळून आले. पावसाच्या पाण्यामुळे जी निसर्गनिर्मित डबकी तयार होतात, त्यामध्ये हा सूक्ष्मजीव आढळला आहे.

'टार्डिग्रेड' वातावरणातील बदलांचा अंदाज घेत आपल्या शरीररचनेत बदल करतो. आतापर्यंतच्या निरीक्षणातून असे समोर आले आहे की, त्याला योग्य वातावरण निर्माण होईपर्यंत अनेक वर्षे तो सुप्‍त अवस्थेत राहतो. मुख्य म्हणजे सुप्‍त अवस्थेतून तो त्याच अवस्थेत बाहेर येतो, ज्या अवस्थेत तो सुप्‍त झाला होता, असेही डॉ. पै यांनी सांगितले.

कल्याणी भाकरे म्हणाल्या, पश्‍चिम घाटात विविध जलचर परिसंस्था आहेत. या परिसंस्थांत वैविध्यपूर्ण सूक्ष्मजीवांसह इतर अनेक जलचरांचा अधिवास आहे.

वाढत्या इको-टुरिझम आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे अधिवास धोक्यात आले आहेत. या अधिवासांचे व त्यावर अवलंबून असलेल्या वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन केले पाहिजे; अन्यथा या प्रजाती शोधण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT