Latest

World Emoji Day: तरुणांच्या मनातील शब्दांची जागा आता अ‍ॅनिमेटेड इमोजीकडे

अमृता चौगुले

पुणे : तरुणांच्या मनातील शब्दांची जागा आता इमोजीने घेतली आहे. ऑनलाइन संवाद साधताना तरुणाई इमोजीतून मनात रुजलेल्या, मनात उमललेल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. वेगवेगळ्या मोबाईल अ‍ॅपवर या भावना व्यक्त करण्यासाठी रेडी इमोजीचे अनेक पर्याय वाढले असून, काही अ‍ॅनिमेटेड इमोजीचे नवीन पर्याय तरुणाईचे फेव्हरिट बनले आहेत. थँक यूपासून ते अभिनंदनापर्यंतच्या विविध भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाई या अ‍ॅनिमेटेड इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. सध्या ऑनलाइन संवाद साधताना इमोजीचा वापर होत असून, त्यात 20 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे.

मध्यमवयीन असो वा महाविद्यालयीन तरुणाई, प्रत्येक ठिकाणी इमोजीतून 'शॉर्टकट'ने संवाद साधताना दिसत आहे. अगदी मनातील आनंद, प्रेम, भीती अन् निराशा… सर्व काही या चित्ररूपी इमोजीतून ते व्यक्त करताहेत. त्यामुळे इमोजीचे तंत्रज्ञान दरवर्षी बदलत असून, आता अ‍ॅनिमेटेड इमोजीचा ट्रेंड सुरू झाला आहे. रविवारी (दि.17) साजर्‍या होणार्‍या जागतिक इमोजी दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने इमोजी ट्रेंडविषयी जाणून घेतले. मयंक शाह म्हणाला, 'मी ऑनलाइन संवाद साधताना नेहमी इमोजींचा भरपूर वापर करतो. सध्या अ‍ॅनिमेटेड इमोजीचा वापर अधिक प्रमाणात करत असून, इमोजी आता आम्हा तरुणांची संवादाची भाषा बनली आहे.'

तरुणांचा वेळ वाचतोय…
हसविणारे, प्रेम व्यक्त करणारे, प्रश्नात्मक, भावनिक असे खूपसे इमोजी तरुणाई एकमेकांना पाठवत चॅटिंग करतात. सतत शब्द टाइप करून चॅटिंगमध्ये वेळ घालविण्यापेक्षा इमोजी पाठवून चॅटिंग करणे जास्त सोयीचे जाते.

भावनांना इमोजीचे रूप…
चॅटिंगमध्ये लांबलचक संदेश पाठविण्यात वेळ घालविण्यापेक्षा इमोजी पाठविल्यावरसुद्धा समोरच्याला भावना कळते. त्यामुळे संदेश लिहिण्यापेक्षा इमोजी पाठवून तरुणाई संवाद साधत आहे. त्याशिवाय विशेष म्हणजे या इमोजीसोबतच काही सांकेतिक भाषाही चॅट करताना वापरली जात आहे. त्यामुळे सध्या तरुणांचा संवाद इमोजींसह सांकेतिक भाषेत होत आहे. चित्रांमधून समोरच्या व्यक्तीपर्यंत भावना योग्यरीत्या पोहोचतात, असे तरुणाई सांगते.

SCROLL FOR NEXT