Latest

पुणे : अखेर १२ कुत्री देण्यास न्यायालयाचा नकार

रणजित गायकवाड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी बेकायदेशीररित्या कारवाई करत स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिलेली 12 कुत्री परत करण्याचा मालकाने केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्र. जि. डोलारे यांनी फेटाळला.

जप्त करण्यात आलेली कुत्री सात दिवसांच्या आत जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या ताब्यात देण्यात यावी. तसेच, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा. याखेरीज, या कुत्र्यांच्या पालनपोषण व वाहतुकीसाठी येणारा प्रतिदिन एकूण खर्च 260 रुपये प्रमाणे एक वर्षांसाठीची रक्कम समितीकडे जमा करत त्याचा बॉण्ड न्यायालयाकडे सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कुत्र्यांचा अनधिकृत सांभाळ तसेच त्यांचे ब्रिडिंग करत त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याचा प्रकार पिपल फॉल अ‍ॅनिमल ट्रस्टच्या मुख्य अध्यक्षा मणेका गांधी यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर, पिपल फॉल अ‍ॅनिमल ट्रस्टच्या पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी लोणिकंद पोलिसांच्या मदतीने 12 कुत्र्यांची सुटका केली होती.

यावेळी, अर्जदाराकडे या कुत्र्यांसंबंधी कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे नव्हती. तसेच, ती उपाशी व तहानलेली होती. त्यांच्या पिंजर्‍यांमधून दुर्गंधी येत होती तसेच ते त्यांची घाण खात होते. सदरची परिस्थिती अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाद्वारे दिलेल्या निर्देशा विपरित होती. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना विविध त्वचेसंबंधी आजार दिसून आले असून त्यांना अस्वच्छ परिस्थितीमध्ये ठेवण्यात आले होते.

कुत्री ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांमध्ये त्यांची काळजी व सांभाळासाठी अर्जदाराने बॉण्ड लिहून देणे आवश्यक होते. परंतु, अर्जदाराने त्याची पुर्तता केली नाही. त्यामुळे, त्यांनी अर्जदारावर जबर खर्च बसवून सदर कुत्र्यांचा ताबा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांच्याकडे देण्याची विनंती केली होती. पिपल फॉल अ‍ॅनिमल ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी न्यायालायत बाजू मांडली.

SCROLL FOR NEXT