बीजिंग : मोराचा पिसारा अतिशय सुंदर दिसत असतो. प्रागैतिहासिक काळातील असा पिसारा असलेला पक्षी अस्तित्वात होता. चीनमध्ये अमेरिका व चीनच्या वैज्ञानिकांनी अशा बारा कोटी वर्षांपूर्वीच्या पक्ष्याचे जीवाश्म शोधले आहे. ही पक्ष्यांची एक वेगळीच प्रजाती आहे.
हा पक्षी अतिशय सुंदर होता व त्यामध्ये त्याचे पंख आणि शेपटीचा पिसारा कारणीभूत होते. प्रजनन काळात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी या पिसार्याचा वापर होत असे. चीनच्या वायव्य भागातील जहोल बायोटा येथे या पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहेत. या भागाला चीनचा 'ज्युरासिक पार्क' म्हटले जाते.
विशेष म्हणजे तिथे ज्या पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहे त्यामध्ये बारा कोटी वर्षांनंतरही या पक्ष्याचे पंख स्पष्टपणे दिसून येतात. या पक्ष्याला 'युआनचुआविस कॉम्प्सोसोरा' असे नाव दिले आहे. हा पक्षी आकाराने छोटा असला तरी त्याची शेपूट मोठी होती. ही शेपूट देहापेक्षा 150 पट अधिक लांब होती. ही पिसारा असलेली शेपूट जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरत असली तरी उडण्यासाठी अडचणीची होती.
त्यामुळे हे पक्षी वेगाने उडू शकत नव्हते. या पक्ष्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तोंडात दातही होते. वणव्यांमुळे जंगले नष्ट होत गेल्याने या जंगली पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत गेला. त्यामुळे हे पक्षी लुप्त झाले.