Latest

पिंपळनेर शहरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी; सजिव देखाव्यांनी लक्ष वेधले

अंजली राऊत

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
येथे श्री रामनवमी निमित्त भगवान श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा पार पडला. गावातील प्रमुख रस्त्यावरून ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने यात्रा मिरवणुकीत सहभागी झाले होते.

‌पिंपळनेर येथील श्रीराम नगर नवयुवक मंडळ व भाविक एकत्र येऊन नवापूर रस्त्यावरील प्रभू श्री राम मंदिरापासून सजविलेल्या रथाद्वारे प्रभू श्री रामचंद्रची प्रतिमा व सजीव देखावा सादर करण्यात आला. या सजीव देखाव्याची परिसरातून शोभायात्रा व भव्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील रामनगर, इंदिरानगर, पिंपळनेर पोलीस ठाणे रोड, सामोडे चौफुली, बस स्टॅन्ड चौफुली, सटाणा रस्ता, महावीर भवन, गोपाळ नगर, नाना चौक, बाजारपेठ, खोल गल्ली व माळी गल्ली या प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या व डीजेच्या तालावर रामनामाच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक भूषण शेवाळे, विजय चौरे तसेच पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दल यांच्या पथकासमवेत कडक बंदोबस्तात ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे व शोभायात्रेचे गावातील प्रमुख मार्गावर राहणाऱ्या महिला भगिनी व रामभक्तांनी रथाचे औक्षण करून समाधानाने दर्शन घेतले. प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय श्रीराम तसेच एकही नारा बोलेगा जय जय श्रीराम असा जयघोष करीत मिरवणूकीत सहभाग नोंदवला. तरुणाईने रामनामाच्या गजरात डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता. विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून प्रभु श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण असा सजीव देखावा यावेळी सादर करण्यात आला. भाविकांना प्रसादाचा लाभ घेत रामनामात तल्लीन होण्याचा अनुभव घेतला. नवापूर रस्त्यावरील प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करून मिरवणूक विसर्जित करण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT