कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : मुंबईत राज्यसभेची निवडणूक गाजते आहे. कोल्हापूरच्या मल्लांनी या निवडणुकीत चुरस आणली आहे. या राज्यसभा निवडणुकीचे निकालाचे परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील सतेज पाटीलविरुद्ध धनंजय महाडिक ही लढत मुंबईत रंगली आहे.
कागलमध्ये ज्याप्रमाणे पक्ष आणि उमेदवार यापेक्षाही गटांतच चुरस व्हायची. तीच परिस्थिती आता पाटील-महाडिक गटांत आहे. निवडणूक कोणतीही असो, चुरस या दोन गटांतच असते. आताही राज्यसभेसाठी महाविकास आघाडीविरुद्ध भाजप यापेक्षाही पाटीलविरुद्ध महाडिक असाच सामना आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर या निकालाचा होणारा परिणाम लक्षात घेऊनच सतेज पाटील यांनी सुरुवातीपासूनच सूत्रे स्वतःकडे ठेवली आहेत, तर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाडिक गट ईर्ष्येने या निवडणुकीत उतरला
आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आता कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, बारा पंचायत समित्या, बाजार समिती, आठ नगरपालिका, इचलकरंजी महापालिका यासह 'कुंभी-कासारी', 'भोगावती', 'बिद्री' यासह या दोन्ही गटांसाठी ईर्ष्येचा टोक गाठलेल्या राजाराम कारखान्याची निवडणूक होणार आहे. राजाराम कारखान्याची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार होईल. मात्र, ही निवडणूक वगळता अन्य सर्व निवडणुकांत स्थानिक नेत्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आहे. त्याचे प्रतिनिधित्व सतेज पाटील करीत आहेत. त्यांच्यासाठी आपला मतदारसंघ ताब्यात ठेवणे हा प्राधान्यक्रम असेल, तर तेथे आपले स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी महाडिक गटाला झटावे लागणार आहे. इचलकरंजी महापालिकेची निवडणूक कधी होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, वर्चस्वाच्या लढाईत पाटील आणि महाडिक हे पुन्हा समोरासमोर असणार आहेत.
राज्यसभेसाठी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पाटील यांना आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे, तर महाडिक यांना राजकीय अस्तित्वाला पुन्हा उभारी द्यायची आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा, 'गोकुळ' येथील महाडिक गटाची सत्ता संपली आहे. आता राजाराम कारखाना वगळता महाडिकांची कोठेही सत्ता नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी महाडिकांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. राज्यसभा निवडणूक ही त्यांच्या द़ृष्टीने महत्त्वाची आहे.
या निवडणुकीत महाडिकांना यश मिळू द्यायचे नाही आणि आपल्या सत्तास्थानांना कुठलाही धक्का लागू नये, यासाठी सतेज पाटील यांनी व्यूहरचना आखली आहे. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका पाहता राज्यसभा निवडणुकीचा निकालाचा या सर्वांवर परिणाम होणार आहे. म्हणूनच पाटील-महाडिक गटांत संघर्ष सुरू आहे.