Latest

पाच राज्यांतील पराभवास नेतृत्वाला दोषी न धरता काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिंतन करावे : बाळासाहेब थोरात 

निलेश पोतदार

संगमनेर; पुढारी  वृत्तसेवा  पाच राज्यात काँग्रेसचा पराभव झाला म्हणून नेतृत्वाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपण कोठे कमी पडलो आहे याचे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्हीच चिंतन करणे महत्वाचे आहे. येथून पुढे देशाच्या हितासाठी एकजुटीने लढले पाहिजे असे स्पष्ट मत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे कोरोनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांच्या कौतुक सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील  काँग्रेसच्या पराभवाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले की, येथून पुढील काळात व्यक्ती द्वेषाचे राजकारण न करता विकासासाठी राजकारण होणे गरजेचे असल्याचे त्‍यांनी सांगितले.

मंत्री थोरात म्हणाले की, सरकार आणि पक्ष म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे. मात्र दुर्दैवाने २०१४ नंतर देशात व्यक्ती द्वेषाचे राजकारण सुरू झाले आणि त्या सूडाच्या राजकारणामुळे गढूळ वातावरण तयार झाले आहे. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी अपेक्षा त्‍यांनी व्यक्‍त केली.

नुकत्याच‌ पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाष्य करताना पाच राज्यात काँग्रेसला यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती असली, तरी त्या पराभवास जबाबदार घरून सोनिया गांधींनी राजीनामा द्यावा, प्रियांकांनी राजकारण सोडावे हे म्हणणारे हे कोण आहेत, हे तपासणे गरजेचे आहे असे ठणकावून सांगत मंत्री थोरात म्हणाले की, काँग्रेस जनांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या गांधी कुटुंबाचा पराभवात दोष आहे असं मी मानत नाही. दुर्दैवाने धर्म – जातीत भेद करून सत्तेवर येण्याचा प्रकार आता वाढला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT