Latest

कोल्हापूर : पाच धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात, विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत पाच धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली. कासारी धरण परिसरात 152 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यातही अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. रविवारीही सकाळपासून पाऊस होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली तरी अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. जिल्ह्याच्या दक्षिण-पश्‍चिमेकडील परिसरात आजही पावसाने हजेरी लावली. जोर नसला तरी पावसाची भुरभुर सुरू होती. यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवत होता.

जिल्ह्यातील कोदे (139 मि.मी.), घटप्रभा (95 मि.मी.), पाटगाव (120 मि.मी.), कुंभी (95 मि.मी.) आणि कासारी (152 मि.मी.) या पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण परिसरातही 61 मि.मी. तर दुधगंगा धरण परिसरात 56 मि.मी. असा दमदार पाऊस झाला. धरण परिसरात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा संथगतीने वाढण्यास सुरूवात झाली आहे. राधानगरीचा पाणीसाठा आज 2.29 टी.एम.सी.पर्यंत गेला. तुळशी 1.39, वारणा 10.25, दधगंगा 5.66, पाटगांव 1 तर कुंभीचा पाणीसाठा 1.02 टीएमसी इतका झाला आहे.

जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 18.9 मि.मी.पाऊस झाला. गगनबावड्यात आतिवृष्टी झाली. तिथे 70.05 मि.मी.पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 49.6 मि.मी., भुदरगडमध्ये 41.2 मि.मी., राधानगरीत 26.7 मि.मी., पन्हाळ्यात 28.3 मि.मी., चंदगडमध्ये 24.3, आजर्‍यात 18.3 मि.मी., कागलमध्ये 11.3 मि.मी. पाऊस झाला.करवीरमध्ये 7.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

SCROLL FOR NEXT