Latest

पहिल्यास तलाक, दुसऱ्यासोबत वाद अन् तिसरे बनावट लग्न

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  वय अवघे ३० वर्षे.. पदरी दोन मुले…. पहिल्या पतीला तलाक दिल्यावर तिने दुसरे लग्न केले. त्याच्यासोबतही पटत नसल्याने कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला अन् विभक्त राहायला सुरुवात केली. आता, बनावट लग्न लावणाऱ्या टोळीने तिचे राजस्थानमध्ये तिसरे लग्न लावून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन एजंट महिलांसह चौघांना गजाआड केले. यात राजस्थानातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

बन्सी मुलाजीराम मेघवाल (५०, रा. बोरनाडा, ता. जोधपूर, राजस्थान), लीलादेवी जेठराम मेघवाल (४२, रा. आरतीनगर, पालगाव, ता. जोधपूर, राजस्थान), हारून खान नजीर खान (४०, रा. बिस्मिल्ला कॉलनी, मिसारवाडी) आणि शबाना हारून खान (३६, रा. बेरीबाग, हर्सल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शबाना आणि हारून यांनी पीडितेला राजस्थानमध्ये विकल्याचे तपासात समोर आले.

पीडितेच्या जबाबानुसार, ती एका हॉटेलवर मोलकरीण म्हणून काम करीत होती. तिला कामाची गरज आहे, हे हेरून एजंट असलेल्या शबाना आणि हारून यांनी तिला काम मिळवून देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी ते तिला घेऊन फुलंब्रीच्या दिशेने गेले. तेथे एका हॉटेलवर त्यांनी जेवण केले. जेवणातून गुंगीचे औषध देऊन आरोपी हारूनने तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडीओ काढला. तिला जोधपूर, राजस्थान येथे नेले. तेथे तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन आरोपी बन्सीलाल, मनोज आणि महावीर यांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यावर तेथील एजंट लीलादेवी हिच्याशी हातमिळवणी करून शबाना आणि हारून यांनी दोन लाख ८० हजार रुपयांत दिनेश भादू याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. तिने दोन महिन्यांत तेथून पोबारा करून गुन्हा दाखल केला.

अडीच कि.मी. प्रवास अन् कारवाई

छावणी ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश केदार, अंमलदार एन. डी. पायघन, सुमेध पवार, मंगेश शिंदे, मीना जाधव यांचे पथक दोन पंच व दोन खासगी चालकांना घेऊन राजस्थानमध्ये धडकले. जोधपूर येथे जाऊन त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. तेथून एजंट महिला लीलादेवी मेघवाल आणि बन्सी मेघवाल या दोघांना अटक केली. ज्याच्यासोबत पीडितेचे लग्न लावून दिले होते, त्याचाही पोलिसांनी शोध घेतला मात्र, तो पसार झाला होता. ही कारवाई करताना पोलिसांचा दोन हजार ६०० कि.मी. प्रवास झाला.

SCROLL FOR NEXT