Latest

कोल्हापूर : पवनचक्क्या चोरणारी टोळी जेरबंद

अमृता चौगुले

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : जखीनपेठ येथील पठारावरील पवनचक्कीचे किमती साहित्य चोरणार्‍या आंतरराज्य टोळीला भुदरगड पोलिसांनी शुक्रवारी रात्री रंगेहाथ जेरबंद केले. संशयित चोरट्यांकडून पवनचक्कीचे मौल्यवान मिश्रधातूचे पार्ट, दोन क्रेन, दोन कंटेनर, इनोव्हा गाडी, मोटारसायकल व आठ मोबाईल असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील (जि. सातारा) राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्याच्या पुतण्याचा समावेश आहे.

जखीनपेठ पठारावर मारुती विंड कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. या ठिकाणच्या पवनचक्की मौल्यवान मिश्रधातूचे अवजड पार्ट गॅस कटरने कापून कंटेनरमधून चोरून नेले जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार संजय मोरे यांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास 9 जणांना रंगेहाथ पकडले. चोरट्यांनी पवनचक्कीचे मौल्यवान पार्ट गॅस कटरने कापून क्रेनच्या साहाय्याने कंटेनरमध्ये भरले होते. यावेळी पोलिसांनी या टोळीकडून 34 टन वजनाचे पनचक्कीचे मौल्यवान मिश्र धातूचे पार्ट, दोन हायड्रा क्रेन, दोन कंटेनर, इनोव्हा गाडी, मोटारसायकल, पाच गॅस सिलिंडर, आठ मोबाईल असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अक्षय प्रकाश चौगुले (वय 30, रा. खेबवडे, ता. करवीर), तारळे येथील राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्यांचा पुतण्या प्रशांत हणमंत जाधव (32, ता. पाटण), तानाजी एकनाथ पवार (33, मंगळवार पेठ, सातारा), संतोष दत्तात्रय जाधव (33, रा. तारळे) संतोष तानाजी ढेरे (रा. ढेरेवाडी, ता. राधानगरी), निहाजमुल्ला जीम अनसारी (23, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश. सध्या रा. चंद्रे फाटा, ता. राधानगरी), उत्तम सोपान कारंडे (28, रा. कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर), मच्छिंद्र महादेव हेपलकर (25, रा. जत, जि. सांगली), प्रफुल्ल हरिचंद्र शर्मा (23, गोपाल गंज, बिहार. सध्या रा. बिद्री, ता. कागल) या 9 जणांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर अधिक तपास करीत आहेत.

जि.प. सदस्याच्या पुतण्याचा समावेश

या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेला प्रशांत हणमंत जाधव हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्याचा पुतण्या आहे. याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह बिहार, उत्तर प्रदेशातील आरोपींचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT