Latest

पर्यटन स्थळे : पर्यटकांची गर्दी वाढली!

Arun Patil

कोल्हापूर ; सागर यादव : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असणारे राज्यातील गडकोट-किल्‍ले, धार्मिक व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. यामुळे हिवाळी पर्यटनाला बहर आला आहे. दिवाळी सणातील सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल होत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने लोकांमध्ये पर्यटनाबद्दल प्रचंड उत्साह आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमुळे तब्बल आठ ते नऊ महिने इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच पर्यटन क्षेत्र बंद होते. 2020 च्या दिवाळीत कोरोनाचा कहर कमी झाल्याने इतर क्षेत्रांप्रमाणे पर्यटनही खुले झाले. हिवाळी हंगामानंतर कोरोनाची दुसरी लाट वाढल्याने मार्च 2021 ला पुन्हा सर्व क्षेत्रे बंद करण्यात आली. सहा ते सात महिन्यांनी लाट ओसरल्याने नवरात्रौत्सवात पुन्हा सर्व क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. यामुळे पर्यटन क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे.

मंदीरे खुली झाल्यानंतर साहसी खेळातील गडकोट मोहिमा, गिर्यारोहण, निसर्ग भ्रमंतीसाठी परवानगी देण्यात आली. यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंह मंदिर, पन्हाळगड, विशाळगड, रांगणा, भुदरगडसह धार्मिक स्थळे, गडकोट-किल्‍ले, न्यू पॅलेस, रंकाळा तलाव, कणेरी मठ व इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, भक्‍त निवास, धर्मशाळा, संग्रहालये, स्थानिक वैशिष्ट्य असणार्‍या वस्तूंची विक्री केंद्रे येथे पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे.

हिवाळी पर्यटनाची जय्यत तयारी…

गतवर्षीचा (सन 2020) उन्हाळी व पावसाळी हंगाम आणि यंदाच्या वर्षातील (2021) उन्हाळी व पावसाळी हंगाम कोरोनामुळे वाया गेला आहे. सुमारे दोन वर्षे हंगाम वाया गेल्यामुळे आगामी हिवाळी हंगाम तरी पदरात पाडावा यासाठीची तयारी पर्यटन व्यावसायीकांनी सुरु केली आहे. दिवाळी सुट्टी बरोबर हिवाळी हंगामातील नाताळची सुट्टी 'कॅश' करण्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षीततेच्या नियमांची अंमलबजावणी केली करण्यात आली आहे. दिवाळी सणानंतर पुढील नोव्हेंबर-डिसेंबर- जानेवारी या तीन महिन्यातील हिवाळी हंगामासाठी अवघे सज्ज झाले आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ, गुळ या खाद्य पदार्थांसह कोल्हापूरची चप्पल, नऊवारी साडी, फेटा, कोल्हापूरी साज, नथ, घोंगडे यासह स्थानिक वैशिष्ट्य जपणार्‍या वस्तूंची दुकाने पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार झाली आहेत. यामुळे गुजरी, चप्पल लाईन, हॉटेल्स-रेस्टॉरंट हाऊसफुल्‍ल दिसत आहेत.

शासकिय संग्रहालये अद्याप 'लॉकडाऊन'च…

कोरोनामुळे गतवर्षी मार्च महिन्याच्या सुमारास वस्तू संग्रहालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सुमारे दिड वर्षानंतर कोरोनाचा कहर कमी झाल्याने मंदीरासह पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असणारी विविध खाजगी ट्रस्टच्या मालकीची असणारी वस्तू संग्रहालयेही पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र अद्याप शासकिय संग्रहालये अद्याप 'लॉकडाऊन'च आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागा अंतर्गत असणार्‍या पुरातत्व आणि पर्यटन विभागाच्यावतीने सुरु असणारी शासकिय संग्रहालये अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत. टाऊन हॉल वस्तू संग्रहालय, शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस), चंद्रकांत मांडरे आर्ट गॅलरी ही संग्रहालये अद्याप बंदच आहेत. यामुळे पर्यटकांना ऐतिहासिक ठेव्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच संग्रहालयांच्या माध्यमातून शासनाला मिळणारे उत्पन्नही बुडत आहे.

SCROLL FOR NEXT