ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगविरोधात अखेर ठाणे पोलिसांनी लूकआउट नोटीस गुरुवारी जारी केली. परमबीर सिंग यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिसांनी दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे.
परमबीर देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ही लूकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. गेले काही दिवस या नोटीसची प्रक्रिया सुरू होती.
याच गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतरांच्या विरोधात लूकआउट नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्यांना देखील नोटीस जारी करण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, यांच्यासह काही अधिकार्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान, रिजाय भाटी आणि केतन तन्ना यांनी केला होता.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकूण 28 जणांना आरोपी करण्यात आले असून त्यात परमबीर सिंग, दीपक देवराज, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एन. टी. कदम आदी आठ पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचे अधिकारी आरोपी आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करुन राज्य गृहरक्षक दलाचा पदभार देण्यात आलेले परमबीर हे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुट्टीवर आहेत. ते चंदिगढमध्ये असल्याचे समजते. 5 मेपासून वैद्यकीय रजेवर जाताना परमबीर यांनी चंदिगढमधील एका स्थानिक रुग्णालयाचे प्रमाणपत्र राज्य पोलीस मुख्यालयाला सादर केले आहे.