नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : पनामा पेपर लीक प्रकरणात सोमवारी बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची पुत्रवधू तसेच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची दिल्लीतील लोकनायक भवनातील सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सलग सात तास चौकशी झाली.
ऐश्वर्याला तिच्या कंपन्या आणि बँक खात्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. ऐश्वर्याने 50 हजार डॉलर खर्च करून खरेदी केलेली कंपनी अवघ्या 1500 डॉलरमध्ये विकण्याचे कारण काय, असा प्रश्न ईडीतर्फे ऐश्वर्याच्या पुढ्यात ठेवण्यात आला तेव्हा ती चांगलीच गोंधळली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. अमिताभ बच्चन यांची सून बनल्यानंतर कंपन्या बंद का करण्यात आल्या, हा प्रश्नही ईडीच्या अधिकार्यांनी ऐश्वर्याला केला. ऐेश्वर्याने काही कागदपत्रे ईडीसमोर सादर केली.
सन 2016-17 पासूनच बच्चन कुटुंबाची चौकशी या प्रकरणात सुरू आहे. सन 2004 नंतर बच्चन कुटुंबीयांनी किती रक्कम परदेशातून मिळविली आहे अथवा पाठविली आहे, अशी विचारणा ईडीकडून करण्यात आली होती. यानंतरबच्चन कुटुंबीयांकडून काही कागदपत्रे ईडीला सोपविण्यात आली होती. पनामा पेपर्स लीक प्रकरणात नामोल्लेख असलेल्या 500 भारतीयांपैकी अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय हेही एक नाव आहे. ईडीने याआधी अभिषेक बच्चनचीही चौकशी केली आहे.
पनामा पेपर्स प्रकरणामुळे जगभरात खळबळ उडाली होती. आईसलँडचे पंतप्रधान सिग्मुंदूर डेव्हिड गुंलॉग्सन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना न्यायालयाने पदासाठी अपात्र घोषित केले होते.
अमिताभ, ऐश्वर्या यांची नावे का?
एका वृत्तानुसार अमिताभ बच्चन यांना परदेशातील 4 कंपन्यांत संचालक बनविण्यात आले होते. तीन कंपन्या बहामा, तर एक व्हर्जिन आईसलँडमध्ये आहे. ऐश्वर्या यापैकी एका कंपनीची आधी संचालिका होती. नंतर तिला भागधारक जाहीर करण्यात आले. ऐश्वर्यासह तिचे वडील, आई व भाऊ भागीदार असलेली एक कंपनी 3 वर्षांतच बंद पडली.