मुंबई : पुढारी वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित क्रांती गाथा या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे होत आहे.
ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर येतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 2016 साली राजभवनावर सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरमध्ये क्रांती गाथा या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून – त्यावेळच्या मुंबई राज्यातून – दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे व भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी पुराभिलेख, व मुंबईतील सावरकर संग्रहालयातून यासाठी माहिती मिळविली आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जलभूषण या नव्याने बांधण्यातआलेल्या इमारतीचे देखील उद्घाटन व द्वारपूजन केले जाणार आहे. राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी मंदिराला देखील प्रथमच पंतप्रधान भेट देतील. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्री, राज्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच निमंत्रित उपस्थित राहणार असल्याचे राजभवनने म्हटले आहे.
मात्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीचा कोणताही स्वतंत्र उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास प्रदीर्घ काळानंतर पंतप्रधान मोदी आणि ते एका व्यासपीठावर येतील. अलीकडेच जीएसटी संदर्भात झालेल्या ऑनलाईन बैठकीत उभयतांची आमने-सामने भेट झाली होती.
हे वाचलंत का?