Latest

पंचगंगा प्रदूषण.. मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष..!

Arun Patil

इचलकरंजी, शरद सुखटणकर : सुळकूड पाणी योजनेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी प्रदूषणाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. परंतु, सद्यस्थितीत पंचगंगा प्रदूषणमुक्त करणे आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र आहे. उगमापासून संगमापर्यंतची नदी काठावरील गावे नदी प्रदूषणास कारणीभूत असताना केवळ इचलकरंजीमुळे नदी प्रदूषित झाल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात नदी काठावरील 106 गावांत एकही शुद्धीकरण प्रकल्प नाही. कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित पाणी राजरोस नदीत मिसळते, हे वास्तव असताना इचलकरंजीकडे बोट दाखवून पाणी योजनेला खो घालण्याचे कारस्थान सुरू आहे.

पंचगंगा नदी इचलकरंजी शहराच्या उशाशी असताना इतर नद्यांमधून योजना राबवण्यापेक्षा पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, असा सूर उमटत आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही इचलकरंजीकरांचीही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी शहरातील अनेक संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी वेळोवेळी पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यासाठी आंदोलन केले होते. पंचगंगा प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजीच कारणीभूत आहे का, याचा सारासार विचार होणेही गरजेचे आहे. केवळ इचलकरंजी शहराला पाणीच द्यायचे नाही, ही भूमिका चुकीची आहे.

इचलकरंजी शहराला पंचगंगा आणि कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. शहराची 54 एमएलडी इतकी गरज आहे. पंचगंगेतून 9 एमएलडी, तर कृष्णा नदीतून 32 एमएलडी पाणी उपसा केला जातो; मात्र प्रदूषणामुळे पंचगंगा आणि गळतीमुळे कृष्णा योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शहरासाठी दोन योजना असूनही इचलकरंजीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. अनेकवेळा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, हे वास्तव आहे.

पंचगंगा नदीचे पाणी आधुनिक तंत्राचा वापर करून शुद्ध करणे तांत्रिकदृष्टया शक्य नसल्याचा महापलिका प्रशासनाचा दावा आहे. पाणी शुद्धीकरणासाठी प्रती 1 हजार लिटरसाठी सुमारे 65 ते 70 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इचलकरंजी शहराची दररोजची गरज पाहता इतका अवाढव्य खर्च करणे प्रशासनाला न परवडणारा आहे. नवी मुंबई येथे पाणी शुद्धीकरण केले जाते; मात्र त्याचा वापर केवळ औद्योगिक वापरासाठी केला जातो. केवळ सिंगापूर आणि मलेशियामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी शुद्ध करून ते पिण्यासाठी वापरले जात असल्याचा दावा महापालिका प्रशसानाचा आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाण्याचे शुद्धीकरण हे महापालिका प्रशासनाच्या आवाक्याबाहेरच आहे, हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.

इचलकरंजी पालिकेने 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधले

इचलकरंजी पालिकेने 20 दक्षलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधलेले आहे. 18 दक्षलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू आहे. त्यानंतर 38 दक्षलक्ष लिटर क्षमतेचे साडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होणार आहे. केेंद्राकडे 20 दक्षलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव सादर केला असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका ही पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी कटिबद्ध आहे.

SCROLL FOR NEXT