Latest

नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा

Arun Patil

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा : धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे येथील दत्त मंदिरात मंगळवारी सकाळी पाणी आल्याने या वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दरम्यान, देव परमपूज्य नारायणस्वामी मंदिरात आले. या दक्षिणद्वार सोहळ्यानिमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

नद्यांच्या पाणी पातळीत सोमवारपासून मोठी वाढ होत आहे. नृसिंहवाडी येथे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगम परिसरात आठ फूट पाण्याची पातळी वाढल्याने मंगळवारी सकाळी श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आले. त्यामुळे दुसरा दक्षिणद्वार सोहळा सकाळी अकराच्या सुमारास झाला. दक्षिणद्वाराचा लाभ घेण्यासाठी कृष्णा नदीत पवित्र स्नानासाठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर सध्या श्रावण महिना असल्यामुळे दर्शनासाठी गर्दी होत आहे. मंदिरात पाणी आल्याने मुख्य मंदिरात होणारे कार्यक्रम आता पूज्य नारायण स्वामी मंदिरात होत आहेत.

मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्यामुळे दत्त देवस्थान कमिटीने मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्रारंभ केला आहे. महालक्ष्मी बँकेजवळ पाणी साचून राहते, त्यामुळे भाविक तसेच नागरिकांना जाणे येणे अवघड झाले आहे.

SCROLL FOR NEXT