Latest

नीरव मोदी ची 1 हजार कोटींची मालमत्ता ईडीने काढली विकायला

Arun Patil

मुंबई ; पुढारी डेस्क : कर्जबुडव्या हीरे व्यापारी नीरव मोदी ची तब्बल 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. यात काळाघोडा येथील आयकॉनिक रीदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपीयन्सी रोड येथील फ्लॅट, कुर्ल्यातील कार्यालयीन इमारत आणि दागिने यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी या मालमत्तांचा लीलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार लीलावासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने लिक्वीडेटरची नियुक्ती केली आहे.

ईडीने काही मालमत्तांचा यापूर्वीच लीलाव केला असून उर्वरित मालमत्ता लीलावासाठी बँकेला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील एका सौरऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. दरम्यान, ईडीने मोदीच्या महागड्या गाड्या, पेंटिंग्स तसेच इतर महागड्या वस्तूंचा लीलाव करून यापूर्वी वसूल केलेले 6 हजार कोटी रुपये पीएनबी बँकेला सुपूर्द केले आहेत.

6500 कोटींचे बुडवले कर्ज

मोदीने लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या माध्यमातून पीएनबी बँकेचे सुमारे 6500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवले होते. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात मोदीची 2600 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. नीरव मोदी सध्या लंडन येथील तुरुंगात असून त्याच्या भारत प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. मोदीने बँकेकडे गहाण न टाकलेल्या मालमत्तांमध्ये वरळीतील समुद्र महल इमारतीतील 100 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे 4 आलिशान फ्लॅट, अलिबागमधील बंगला, जैसलमेरमधील पवनचक्की यांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता ईडीच्या ताब्यात राहणार आहेत.

काळाघोडा येथील आयकॉनिक रीदम हाऊस इमारत नीरव मोदीने 2017 साली त्याच्या फायरस्टार डायमंड हीरे कंपनीचे मालक कर्माली कुटुंब यांच्याकडून 32 कोटी रुपयांना खरेदी केली होती. या हेरिटेज मालमत्तेचे रुपांतर आलिशान ज्वेलरी शोरूममध्ये करण्याची मोदीची योजना होती.

ईडीने रीदम हाऊससह इतर मालमत्ता जप्त केल्यानंतर रीदम हाऊस वाचवण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी क्राऊड फंडिंगचा प्रस्ताव दिला होता. लीलाव प्रक्रियेबाबत ईडीच्या अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चाही केली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज कमिटीनेही सार्वजनिक उद्देशांसह ही वास्तू ताब्यात घेण्याबाबत चर्चा केली होती.

SCROLL FOR NEXT