Latest

क्रीडा : नीरजचे प्रेरणादायी यश, पण… 

Arun Patil

जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका व केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदके मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्याजवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा व सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या इच्छाशक्तीमध्येच हे खेळाडू कमी पडतात, असे दिसून येते.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा जागतिक मैदानी स्पर्धा असो, भारतीयांसाठी कोणतेही पदक म्हणजे मृगजळासारखेच असते. ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीतील सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या नीरज चोप्रा याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेतही इतिहास घडविला. त्याचे सुवर्णपदक हुकले तरीही, त्याची ही कामगिरी सर्वच भारतीयांसाठी प्रेरणादायक आहे.

अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडाप्रकार मानला जातो. त्यामध्ये धावण्याच्या वेगवेगळ्या शर्यती, गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक इत्यादी फेकीचे क्रीडाप्रकार, उड्यांच्या प्रकारातील लांब उडी, उंच उडी तिहेरी उडी, पोलव्हॉल्ट इत्यादी स्पर्धा असतात. साहजिकच, खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची आणि त्याद्वारे पदके जिंकण्याची हुकमी संधीच असते.

दुर्दैवाने ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धांबाबत भारताला नेहमीच पदकांचा दुष्काळ पाहावयास मिळाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला ऑलिम्पिकमधील पदकाचे स्वप्न नीरजने साकार केले. जागतिक मैदानी स्पर्धा हीदेखील ऑलिम्पिक इतकीच अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मात्र येथेही भारताच्या वाट्याला निराशाच आली आहे. इसवी सन 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिने लांब उडीत ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर जागतिक मैदानी स्पर्धेचे पदक जिंकण्याची किमया नुकतीच नीरज याने साकार केली.

जागतिक स्पर्धेसाठी भारताने 18 पुरुष खेळाडू व चार महिला खेळाडू असे 22 खेळाडूंचे पथक पाठवले होते. अर्थात, पदकांसाठी फक्त नीरज हाच एकांडी शिलेदार मानला गेला होता. तरीही नीरज याच्याबरोबरच रोहित यादव (भालाफेक), मुरली श्रीशंकर (लांब उडी), एल्डॉस पॉल (तिहेरी उडी), अविनाश साबळे (तीन हजार मीटर्स स्टीपलचेस) व महिलांमध्ये अन्नू राणी (भालाफेक) या खेळाडूंनी अंतिम फेरीत स्थान मिळवत समाधानकारक कामगिरी केली. यापूर्वी सन 2015 मध्ये भारताचे तीन खेळाडू जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. त्या तुलनेत ही प्रशंसनीयच कामगिरी आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपाठोपाठ जागतिक स्पर्धेतही भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकण्याची किमया यापूर्वी नॉर्वे देशाचा खेळाडू आंद्रेस थोर्किल्डेसन याने सन 2009 मध्ये साकार केली होती. या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी नीरज साकार करील, अशी अपेक्षा होती. मात्र काही वेळेला इच्छाशक्ती भलेही खूप चांगली असेल; पण अपेक्षेइतकी शंभर टक्के शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती नसेल, तर त्याचा अनिष्ट परिणाम कामगिरीवर होतो, हेच यंदा पाहावयास मिळाले. टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी अंतिम फेरीत एकच हुकमी 'थ्रो' करून नीरज हा अतिशय निश्चिंत झाला होता. त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर असलेला आत्मविश्वास जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसून आला नाही. जागतिक स्पर्धेनंतर त्याने लगेचच राष्ट्रकुल स्पर्धेतून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. जागतिक स्पर्धेच्याच वेळी तो स्वतःच्या तंदुरुस्तीबाबत साशंक होता.

मात्र जागतिक स्पर्धेसारखी महत्त्वाची स्पर्धा सोडून देणे त्याच्यासाठी आणि पर्यायाने देशासाठीही अशक्य होते. अर्थात पदक मिळण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती, त्यामुळेच आपल्या हाताला आणि खांद्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण भालाफेक करणारच! हाच निर्धार त्याने ठेवला होता. इतरांप्रमाणे त्यालाही प्रतिकूल वार्‍याचा त्रास झाला. अपेक्षेइतके नव्वद मीटर्स अंतराचे लक्ष्य त्याला साधता आले नाही. 88.13 मीटर्स ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. सुवर्णपदक जिंकणार्‍या ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसन याने तीन वेळा नव्वद मीटर्स पलीकडे भाला टाकला. अतिशय आरामात आणि आत्मविश्वास दाखवत त्याने ही कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याबरोबरच ते राखणे हे जास्त आव्हानात्मक असते आणि हे आव्हान अँडरसन याने लीलया पार केले.

मर्यादितच यश

ऑलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे यश केवळ एक-दोन खेळाडूंपुरतेच मर्यादित असते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर एरवी भारतीय खेळाडू अन्य आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि मैदानी स्पर्धेत भरपूर पदकांची कमाई करीत असतात. मात्र ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेच्या वेळी त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो, असाच आजपर्यंत अनुभव पाहावयास मिळाला आहे. तिहेरी उडीत एल्डॉस पॉल याने अंतिम फेरी गाठली आणि या क्रीडा प्रकारात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. अंतिम फेरीत मात्र अपेक्षेइतकी सर्वोत्तम कामगिरी तो करू शकला नाही आणि नवव्या स्थानावर त्याला समाधान मानावे लागले. नीरज याच्याबरोबरच रोहित यादव यानेही प्रथमच भालाफेकीत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

21 वर्षीय रोहित याचीही पहिलीच जागतिक स्पर्धा होती, हे लक्षात घेतले, तर त्याला मिळालेले दहावे स्थान आगामी कारकिर्दीसाठी प्रेरणादायकच आहे. या मोसमात सातत्याने नवीन राष्ट्रीय विक्रम करणारा अविनाश साबळे याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. स्टीपलचेसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तो सातत्यपूर्ण धावत होता. नंतर मात्र त्याचा वेग कमी पडला आणि तो अकराव्या स्थानावर फेकला गेला. मुरली श्रीशंकर याने लांब उडीत अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याला सातवे स्थान मिळाले. महिलांमध्ये अन्नुराणी हिने भालाफेकीत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. तथापि तिलादेखील सातव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

इच्छाशक्तीचा अभाव

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अमेरिकन धावपटूंनी पदकांच्या तालिकेत प्रथम क्रमांक घेत निर्विवाद वर्चस्व राखले. इथिओपिया, जमेका व केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदके मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्याजवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडत असतो. मिल्खा सिंग, गीता झुत्शी, श्रीराम सिंग इत्यादी ज्येष्ठ खेळाडूंच्या काळात सुविधा आणि सवलतींची वानवाच होती. त्यांच्या तुलनेत हल्लीच्या भारतीय धावपटूंच्या पायाशीच सुविधा व सवलती लोळण घालत असतात, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. घोड्याला तुम्ही पाण्यापाशी न्याल; परंतु पाणी प्यायचे की नाही, हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भारतीय धावपटूंबाबत असाच काहीसा अनुभव येत आहे.

भारतीय खेळाडूंना फिजिओ, मानसिक तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ परदेशी प्रशिक्षकांची मदत, क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ, दरमहा भरपूर आर्थिक शिष्यवृत्ती किंवा नोकरी अशा सर्व सुविधा व सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या इच्छाशक्तीमध्येच हे खेळाडू कमी पडतात, असे दिसून येते. तसेच अनेक वेळेला आशियाई क्रीडा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर लक्ष केंद्रित करतानाच, या स्पर्धांपलीकडेही काही महत्त्वाच्या स्पर्धा असतात याचा त्यांना विसर पडतो की काय, अशी नेहमीच शंका येते. अशा महत्त्वाच्या स्पर्धांबाबत आपले खेळाडू गांभीर्याने विचार करत नाहीत.

भारतीय धावपटूंच्या सुदैवाने गेल्या सात-आठ वर्षांमध्ये शासकीय स्तरावर खेळाडूंसाठी पोषक पावले उचलली गेली आहेत. संभाव्य ऑलिम्पिकपटूंसाठी दरमहा मोठी रक्कम प्रशिक्षण व अन्य सुविधांसाठी शासनातर्फे दिली जात आहे. 'खेलो इंडिया,' 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' इत्यादी विविध योजनांद्वारे खेळाडूंनी नैपुण्यशोध व त्याचा विकास यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे स्वतः माजी ऑलिम्पिकपटू असल्यामुळे त्यांना खेळाडूंची सुखदुःखे अगदी जवळून माहीत असतात. महासंघातर्फे खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्यांनीही अनेक योजना राबवल्या आहेत. नीरज चोप्राचे ऑलिम्पिक सुवर्णपदक ही या योजनांची पावती होती, असेही म्हटले जाते.

इथिओपिया, जमेका व केनिया या देशांमधील खेळाडूंची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. साहजिकच, आपण जर जागतिक किंवा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले तरच आपल्याला चांगली पारितोषिके व नोकरी मिळू शकते, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवतच या देशांचे खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवतात. तशी इच्छाशक्ती किंवा ध्येय भारतीय खेळाडूंनी ठेवले, तर निश्चितपणे ते जागतिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करू शकतील.

खेळाडूंना ज्या काही सुविधा व सवलती मिळत असतात, त्यासाठी होणारा खर्च हा देशातील नागरिकांनी दिलेल्या करांच्या उत्पन्नाद्वारेच केला जातो, हे या खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे. सुविधा व सवलती यांची रेलचेल असताना ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये पदक मिळवणे ही आपली नैतिक जबाबदारी व उत्तरदायित्व आहे, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे; तरच खर्‍या अर्थाने अ‍ॅथलेटिक्स जागतिक नकाशावर भारताला चांगले स्थान मिळू शकेल.

मिलिंद ढमढेरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT