Latest

नीरज चोप्रा याच्यासह १२ जणांना खेलरत्न पुरस्कार प्रदान

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या भालाफेकपटू नीरज चोप्रा सह 12 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, क्रिकेटपटू शिखर धवनसह 35 जणांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दहा जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आले.

भारतीय खेळाडूंनी यंदा टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 125 वर्षांच्या इतिहासात भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धेतील 'ट्रॅक अँड फिल्ड' प्रकारातील पहिलेच पदक ठरले.

शिवाय 2008 नंतर हे भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. यासह अनेक खेळाडूंनी भारताला ऐतिहासिक क्षण दाखवले. त्यामुळेच यंदा नीरजसह 12 खेळाडूंचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

यामध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेनन, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश व मनप्रीत सिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमीत अंतिल, पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री हेही या पुरस्काराचे मानकरी ठरले. मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर 2016 च्या रियो ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू :

नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी. आर. श्रीजेश (हॉकी), लव्हलिना बोर्गोहेनन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमीत अंतिल (भालाफेक), अवनी लेखरा (नेमबाजी), कृष्णा नागर (बॅडमिंटन), एम. नरवाल (नेमबाजी), मनप्रीत सिंग (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार : प्रीतम सिवाच (हॉकी प्रशिक्षक), जयप्रकाश नौटियाल (पॅराशूटिंग प्रशिक्षक), सुब्रमण्यम रमण (टेबल टेनिस प्रशिक्षक), डॉ. तपन कुमार (जलतरण प्रशिक्षक), राधाकृष्णन नायर पी. (अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक), संध्या गुरुंग (बॉक्सिंग प्रशिक्षक), सरकार तलवार (क्रिकेट प्रशिक्षक), आसन कुमार (कबड्डी प्रशिक्षक), टी. पी. ओसेफ (अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक)

शिखर धवनला 'अर्जुन'चा मान

क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमारसह 35 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार : अरविंदर सिंग (अ‍ॅथलेटिक्स), सिमरनजित कौर (बॉक्सर), शिखर धवन (क्रिकेटर), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), अभिषेक वर्मा (शूटर), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया (कुस्ती), योगेश, निषाद कुमार, प्रवीण कुमार (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), सुहास यथीराज (बॅडमिंटन), सिंगराज अधना (शूटर), भाविना पटेल (टेबल टेनिस), हरविंदर सिंग, सरत कुमार (पॅरा अ‍ॅथलेटिक्स) आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता पुरुष हॉकी संघातील सदस्य.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT