Latest

निवडणुका : नव्या वर्षात निवडणुकांचा धुरळा

अमृता चौगुले

कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : नव्या वर्षात जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने, बँका, बाजार समितीसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा ( निवडणुका ) धुरळा उडणार आहे. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे नेते एकमेकांचे वस्त्रहरण करत आहेतच. त्याचा पुढचा अंक या निवडणुकीत पाहायला मिळेल. त्यामुळे नव्या वर्षात सत्ता कुणाची, प्रतिष्ठापना कुणाची याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीने ( निवडणुका ) नव्या वर्षाची सुरुवात होत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी जिल्हा बँकेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. या सामन्यात एकमेकांची लक्तरे काढतच राजकारणाने सरत्या वर्षाला निरोप दिला. नवे वर्ष सत्तेत कोण कोण बसणार याचे उत्तर देणार आहे.

कागलचा छत्रपती शाहू व गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील या दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
आता येणार्‍या काळात नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार्‍या निवडणुका सहकारात होणार आहेत. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. येथे विनय कोरे यांचे वर्चस्व आहे. तेथील राजकारणात कोरे यांनी नवी पेरणी केली आहे. तर त्यांच्या विरोधात मोट बांधण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.

आगामी काळात छत्रपती राजाराम, भोगावती, कुंभी-कासारी, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर, दूधगंगा-वेदगंगा बिद्री, दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, शरद शिरोळ, सदाशिवराव मंडलिक, दौलत चंदगड या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत.

भोगावतीवर आमदार पी. एन. पाटील यांचे वर्चस्व आहे. तर त्यांचे राजकीय विरोधक माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे कुंभी कासारी सहकारी साखर करखान्यावर वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन कारखान्यांमधील निवडणुकीत चुरस असेल. भोगावतीत संपतराव पवार-पाटील, धैर्यशील पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरतील. कुंभीमध्ये गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, प्रकाश देसाई यांच्या भूमिकांकडे लक्ष आहे.

जिल्हा बँकेतील शिरोळ तालुक्यातील राजकारणातून शरद साखर कारखान्यावर काय परिणाम होणार याचे उत्तर आगामी काळातच मिळेल. बिद्री कारखान्यात के. पी. पाटील यांचे विरोधक कितपत एकवटणार यावर कारखान्याचे राजकारण अवलंबून आहे. आमदार प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव, खा. संजय मंडलिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या भूमिका तेथे महत्त्वाच्या ठरतील.

सदाशिवराव मंडलिक कारखान्यात नेमके काय होणार याचे उत्तर जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात आहे. एकेकाळी ज्या कारखान्यातून संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आकाराला यायचे, कुणाला खुर्चीत बसवायचे आणि कुणाच्या पायाखालचा जाजम ओढायचा याची खलबते व्हायची, त्या पंचगंगा कारखान्यात आता राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला नाही. मात्र सत्तेसाठी संघर्ष अटळ आहे. त्याचबरोबर वीरशैव, अर्बन, कमर्शिअल, शामराव शिंदे, गडहिंग्लज अर्बन, इचलकरंजी जनता, कोजिमाशी पतसंस्था या सहकारी संस्थांच्या लढतीही लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

मनपा, जि.प.मध्ये नेत्यांची कसोटी

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक व्हायची आहे; तर जिल्हा परिषदेची मुदत येत्या मार्चमध्ये संपत आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये नेत्यांची कसोटी लागणार आहे. बहुमताची संख्या गाठण्यासाठी नेत्यांच्या जोडण्या आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

'राजाराम'कडे जिल्ह्याचे लक्ष

छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक सभासद अपात्रतेपासूनच गाजत आहे. तेथे 806 सभासद अपात्रतेविरोधात न्यायालयात गेले आहेत. या कारखान्यात सत्तारूढ महादेवराव महाडिक विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील असाच सामना होणार आहे.

SCROLL FOR NEXT