Latest

निलोफर मलिक- खान : दाऊद कनेक्शन दाखवण्यासाठी खोटे पुरावे

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुर्ल्यातील जमीन व्यवहार 55 लाखांचा आहे. माझ्या वडिलांवर झालेले आरोप पाहता ही सिव्हिल केस असायला हवी. पण भाजपच्या विरोधात बोलल्यामुळे वडिलांना नाहक गोवण्यासाठी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊद कनेक्शन दाखवण्यासाठी ईडीने खोटे पुरावे तयार केले व तेच कोर्टात दाखवले जात आहेत, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक – खान हिने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

55 लाखांच्या व्यवहारातील रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली गेली असे कसे म्हणता येईल? राजकीय फायद्यासाठी मुस्लीम व्यक्तीचे नाव दाऊदशी जोडले जाते. पण आम्हाला मुसलमान म्हणून या देशात स्वतंत्र ओळख नाही का? असा प्रश्‍नही तिने विचारला. निलोफर मंत्रालयाजवळील धरणे आंदोलनात कुटुंबीयांसह सहभागी झाली होती. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत ती बोलत होती.

कुर्ल्यातील जमीन खरेदी केली तेव्हा नवाब मलिक हे महसूल मंत्री होते, असे ईडीने रिमांड कॉपीत नमूद केले आहे. पण ते कधीही महसूल मंत्री नव्हतेे. तरीही जेलमध्ये ठेवण्यासाठी ईडीने रिमांड कॉपीत खोटी माहिती सादर केली आहे. राजकीय आकसातून नेत्यांना लक्ष्य केले जात असताना त्यांच्या कुटुंबीयांना भीती दाखवली जात आहे, धमकावले जात आहे, असे निलोफर मलिक – खान हीने सांगितले.

सूडबुद्धीने कारवाई : डॉ. सईदा खान

मलिक यांची भेट घेण्यासाठी त्यांची बहीण व माजी नगरसेविका डॉ. सईदा खान ईडी कार्यालयात गेल्या. सईदा यांना काहीच मिनिटे भावाला भेटता आले. त्यानंतर बोलताना सईदा खान म्हणाल्या, माझ्या भावावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे. पण आम्ही हटणार नाही, हरणार नाही. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही. न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा डॉ. सईदा खान यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT