Latest

नियोजन : खरीप हंगामासाठी बियाणांची निवड कशी करावी?

अमृता चौगुले

यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस वेळेपूर्वीच होत आहे. देशातील बहुतांश ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी झाले आहेत आणि अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आपल्याकडे सिंचित जमीन फारच कमी असल्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाच्या वेळापत्रकानुसारच खरिपाचे नियोजन करतात. असे असले तरी, हवामान विभागाच्या अंदाजावर हल्ली फारसे अवलंबून राहता येत नाही. कारण 'अल निनो'चा कमी-अधिक प्रभाव आणि बदलणारे वातावरण यामुळे पावसाचे आगमन मागे-पुढे होऊ शकते. तसेच प्रमाणही कमी-अधिक होऊ शकते. तसेच पावसाचा अंदाज देशभरासाठी वर्तविला जातो. प्रत्येक राज्यात किंवा भौगोलिक विभागात पावसाचे आगमन आणि प्रमाण याविषयी फारशी अचूक माहिती मिळत नाही.

तालुका, गावपातळीवर अभ्यास करून पावसाचा अंदाज वर्तविण्याची आणि शेतकर्‍यांना त्यानुसार नियोजन करायला सांगण्याची गरज तज्ज्ञ हल्ली वारंवार व्यक्त करतात. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यामुळे पाऊस अधिकाधिक लहरी झाला आहे. मागील 10 वर्षांतील पहिली चार वर्षे आपल्याकडे अनेक ठिकाणी दुष्काळ किंवा टंचाईसद़ृश परिस्थिती होती. त्यानंतर गेल्या तीन-चार मोसमात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार पिकांची निवड करणे आवश्यक ठरते. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार्‍या विभागांत कमी पाण्यावर येणारी पिके निवडणे गरजेचे आहे.

शेतमाल निर्यातीसाठी असलेल्या ट्रॅसिबिलिटी नोंदणीच्या प्रणालीमध्ये देशातील 72,280 शेतकर्‍यांपैकी महाराष्ट्रातील 62,344 शेतकरी आहेत. भारतातील 129 भौगोलिक मानांकनापैकी महाराष्ट्रातील 26 आहेत. देशात भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकरी 5,260 आहेत. त्यापैकी 4390 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 65 टक्के फळे, 55 टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक 4500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. शेतकरी, शेतमजूर, बियाणे कंपन्या, खत कंपन्या, विक्री-विपणानातील लोक अशा अनेकांची खरिपाची लगबग सुरू होते. आज बदलत्या काळात हवामानाचा लहरीपणा विचारात घेत पावसाचा अंदाज घेऊनच शेतीतील कामांचे नियोजन करायला हवे.

सुरुवातीला पाऊस पडून मध्येच काही दिवस खंडित झाला, तरी पिकांचे नुकसान होते. कोवळी पिके करपून जातात. त्यामुळे पाऊस केव्हा येणार आणि कधी उघडणार याचा अंदाज स्थानिक पातळीवर घेऊनच नियोजन केलेले बरे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी हताश होऊन जातो. त्याला आत्मविश्वास देण्यासाठी हवामानावर आधारित कृषिव्यवस्था हाच पर्याय आहे.

हवामानाचा अंदाज घेण्यासाठीची 'मॉडेल' बदलली आहेत. अधिकाधिक अचूक पद्धतीने अंदाज कसा वर्तविता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. ऐनवेळी पावसाच्या वाटचालीत येणारे अडथळे गृहित धरून नियोजन करणे आणि तज्ज्ञांनी त्यानुसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सरासरी एक हजार मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु तो सर्वत्र एकसमान पडत नाही. त्यामुळे जिल्हा पातळीवर खरीप नियोजनासाठी ज्या बैठका होतात, त्यात हवामानावर आधारित नियोजन होऊन कृषी खात्यामार्फत शेतकर्‍यांना सातत्याने मार्गदर्शन होण्याची नितांत गरज आहे.

राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. दुष्काळी भागात सामान्यतः फळबागा, फुलशेती, फळभाज्या अशी कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. त्याचप्रमाणे शेवगा, आंबा, करवंदे, द्राक्षे यांचीही लागवड शेतकर्‍यांनी करायला हवी. जास्त पाणी लागणारी पिके अशा भागांमध्ये घेऊ नयेत. पावसाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावीत. तसेच योग्य वेळी योग्य कामे उरकल्याने लागवडीच्या खर्चात बचत होते, हेही लक्षात ठेवायला हवे. पिकांना चांगला दर मिळणे शेतकर्‍याच्या हातात नसले तरी लागवड खर्च वाचविणे त्याच्या हातात निश्चितच आहे. पाण्याची हक्काची सोय असेल, तर केव्हाही पेरणी केली तरी चालू शकते. परंतु कोरडवाहू जमिनीत किमान 70 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे चांगले. त्यामुळे उगवण व्यवस्थित होऊन पेरा वाया जाण्याचा धोका राहत नाही. वेगवेगळ्या पिकांसाठी खतांची वेगवेगळी मात्रा द्यावी लागते. तज्ज्ञांनी ज्या प्रमाणात शिफारस केली असेल, त्याच प्रमाणात पिकांना खते देणे इष्ट ठरते. मिश्र खतांची निवड योग्य ठरते. कारण त्यामुळे खर्चात बचत होते आणि जमिनीला सर्व पोषक घटकही मिळतात.

पावसाळा तोंडावर आलेला असताना खतांची आणि बी-बियाण्यांची दुकाने सजू लागतात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बियाणांची निवड अत्यंत सजगतेने करावी. बियाणे नवीन असेल, तर केवळ दहा टक्के जागेतच ते लावावे. स्वतःचा आणि इतरांचा पूर्वानुभव विचारात घेऊनच बियाण्याची निवड केलेली चांगली. अनेक शेतकरी घरचेच बियाणे वापरतात. परंतु अशा बियाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि रसायने बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे बीजप्रक्रिया सोपी झाली आहे.

पेरणी करताना यांत्रिक पद्धतीचा अवलंब केलेला बरा. ती अधिक अचूक आणि शास्त्रशुद्ध असते. पारंपरिक पद्धतीने पेरणी केल्यास मृतसरी पाडणे, मृद्संधारण या बाबी विसरू नयेत. उतारावर पेरणी करताना ती आडव्या पद्धतीने करावी. खर्चात कपात करण्याच्या सर्व पद्धती सांगण्यासाठी कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन नियोजन केल्यास फायदा होईल. शेतकर्‍यांचे गट केले असतील, तर त्यांच्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. अलीकडील काळात कृषी खात्याकडून मोबाइलवर मार्गदर्शक संदेश पाठविले जातात. या संदेशांकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन केल्यास फायदा होऊ शकतो.

अतिवृष्टीसारखे संकट उद्भवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रत्येक तहसील कार्यालयात असतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यास विसरू नका. नुकसान झाल्यास भरपाईसाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल. त्याचप्रमाणे खते, बियाणे आणि अन्य सामग्रीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास लेखी तक्रार करण्याची दक्षता शेतकर्‍यांनी घ्यायला हवी.

जूनमध्ये पाऊस सुरू होत असला, तरी अनेक पिकांची लागवड जुलै महिन्यात करण्यात येते. तसेच ज्या भागात उशिरा पाऊस येतो, तेथेही जुलैमध्येच पेरणी केली जाते. खरीप भूईमुगाची पेरणी सात जूनपूर्वी सामान्यतः केली जाते. तोपर्यंत पेरणी न झाल्यास एरंड किंवा सूर्यफूल अशी पिके घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

भूईमुगाला मूळ कुजव्या आणि जमिनीतून उद्भवणार्‍या अन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. सूर्यफुलाची पेरणी साधारणतः 15 जुलैपर्यंत केली जाते. मध्यम किंवा भारी जमिनीत सूर्यफुलाची लागवड करता येते. पेरणीपूर्वी सूर्यफुलाच्या बियाण्यावर बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घेणे चांगले. सूर्यफुलांच्या झाडांची संख्या हेक्टरी 80 हजार ते 1 लाखाच्या घरात ठेवावी. एरंडाचे पीक हलक्या आणि मध्यम जमिनीत येते.

तज्ज्ञांनी शिफारस केलेले सुधारित बियाणे वापरणे फायद्याचे ठरते. तसेच पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि स्फुरद जीवाणूंची बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. उशिरा घेण्यात येणार्‍या पिकांमध्ये कारळा हे एक प्रमुख पीक आहे. याची पेरणी 15 ऑगस्टपूर्वी करणे गरजेचे असते. उतारावर आडव्या पद्धतीने कारळ्याची पेरणी केली जाते. पेरणीनंतर पंधरा दिवसांनी विरळणी केली जाते. कारळ्याच्या दोन रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करणे हितावह ठरते. मोसमी पावसाचा अंदाज स्थानिक पातळीवर वर्तविण्याची सोय सर्वत्र उपलब्ध नाही. तथापि, स्थानिक पातळीवर शेतकर्‍यांना अंदाज घेता येतो. तसेच स्थानिक कृषी अधिकार्‍यांकडूनही माहिती मिळविता येते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार खरिपाचे नियोजन केल्यास भरघोस पीक घेता येईल.

नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी खरिपाच्या नियोजनात गुंतले आहेत. हवामानबदल आणि अन्य कारणांमुळे पावसाने मध्येच ओढ देणे किंवा अतिवृष्टी, अवर्षण असे प्रकार वारंवार उद्भवतात. त्यामुळे हवामानावर आधारित नियोजन हाच एकमेव पर्याय उरतो. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे.
त्यामुळे बियाणांची निवड अत्यंत सजगतेने करावी. खते, बियाणे आणि अन्य सामग्रीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास लेखी तक्रार करण्याची दक्षता शेतकर्‍यांनी घ्यायला हवी.

– विलास कदम

SCROLL FOR NEXT