Latest

नाशिक : हनुमानाच्या जन्मभूमीवरून कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र जुंपली

Arun Patil

नाशिक / त्र्यंबकेश्वर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात विविध ठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्यावरून राजकीय वाद सुरू असतानाच, आता हनुमान जन्मस्थळावरून साधू-महंतांनी कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा नवा संघर्ष उभा केला आहे.

श्रीरामभक्त हनुमान यांचे जन्मस्थळ नाशिकजवळील अंजनेरी की, कर्नाटकातील किष्किंधा यावरून वाद सुरू झाल्याने या संदर्भात मंगळवारी (दि. 31) नाशिक येथे पंचायत बोलाविण्यात आली आहे.

महंत गोविंदानंद महाराज यांनी हनुमानाचे जन्मस्थान हे कर्नाटकातील किष्किंधा हेच असल्याचे सांगत, काही पुरावेदेखील दिले आहेत. गोविंदानंद यांच्या या भूमिकेला विरोध करीत अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याची ठाम भूमिका नाशिकमधील साधू-महंतांनी एकवटत परखडपणे मांडली आहे.

गोविंदानंद महाराज यांचे म्हणणे एकतर्फी आहे. वाल्मिकी रामायणातील श्लोकाच्या आधारे किष्किंधा हे हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. चारही आखाडे त्यासाठी येतात, असे धार्मिक, पौराणिक महत्त्व पाहता व अनेक संदर्भ पाहता, अंजनेरी हेच हनुमंताचे जन्मस्थळ आहे. वेद, पुराणे यांचा अभ्यास करून आणखीही माहिती घेतली जाईल, असे नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी सांगितले.

निधी पळवण्यासाठी वाद?

नाशिकचेच महंत सुधीरदास महाराज म्हणाले की, हरिहर असे पौराणिक महत्त्व असलेल्या त्र्यंबकमधील ब्रह्मगिरी या पर्वताप्रमाणेच अंजनेरी पर्वताला अत्यंत महत्त्व आहे. अंजनीमातेने भगवान शिवाकडे केलेल्या तपश्चर्येचे फळ म्हणून अंजनीमातेला वायुरूपाने हनुमान प्राप्त झाले. त्यावरून या पर्वताचे नाव अंजनेरी पडले असून, ते अनादी काळापासून आहे. त्यामुळे या स्थळाबाबत पौराणिक महत्त्व आणि आमची श्रद्धा आहे. अंजनेरी पर्वत व परिसराच्या विकासासाठी शासन निधी देणार असून, हा निधी पळविण्यासाठी जन्मस्थळावरून वाद घालण्याचा खटाटोप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT