बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : येत्या शुक्रवारपासून रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 पर्यंत वीकेंड कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. हा कर्फ्यू दोन आठवड्यांपर्यंत लागू असेल. नाईट कर्फ्यूची मुदत 17 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्यामुळे हे नवे निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झाला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोरोना सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी चाचण्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गाचा दर 5 टक्क्यांवर गेल्यास लॉकडाऊन करण्याची शिफारस करण्यात आली. तूर्तास वीकेंड कर्फ्यू, हाफ लॉकडाऊनसह काही कठोर निर्बंध लागू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना आणि ओमायक्रॉनवर नियंत्रणासाठी कठोर नियम जारी करण्यात आले आहेत. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी खुल्या जागेत कमाल उपस्थिती 200 जणांची असेल. सभागृहातील कार्यक्रमांसाठी केवळ 100 जणांनाच प्रवेश असेल. कोणत्याही वेळी मोर्चा, मिरवणूक, यात्रा आयोजित करता येणार नाहीत. चित्रपटगृह, पब, क्लब, बार आदी ठिकाणी केवळ 50 टक्के लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पुढील दोन आठवड्यांमध्ये नियम कठोर केले जाणार आहेत. याचे परिणाम पाहून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या कोरोना संसर्गाचा दर 2.59 वर गेला आहे. दोन आठवड्यांआधी हा दर 0.8 पेक्षा कमी होता. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून आता पुन्हा एकदा कठोर निर्बंधाची वेळ आली आहे. नागरिकांना कोरोनाचे दोन डोस सक्तीचे करण्यात यावेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. संसर्गाचा दर वाढला, तरी कोरोना मृत्यूचा दर 0.16 टक्के आहे. गेल्या दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजारांवर गेली आहे. त्याआधी ही संख्या 3 हजारांपर्यंत होती. आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. संसर्ग वाढतच असून तो 5 टक्क्यांवर गेल्यास लॉकडाऊन जारी करावे अन्यथा गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागण्याचा इशारा तज्ज्ञांनी बैठकीत दिला.
महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. तेथील स्थितीचा अंदाज घ्यावा. कर्नाटकात कोरोना रुग्णांसाठी खाट सज्ज ठेवावेत. संसर्ग अधिक असणार्या राज्यांतील स्थितीचा आढावा घेऊन कठोर उपाययोजना करावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यानुसार सरकारने नाईट कर्फ्यूमध्ये वाढ आणि वीकेंड कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला.
राज्यात दिवसभरात 2,479 रुग्ण
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी 1,290 रुग्ण आढळले होते. दुसर्याच दिवशी यामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. मंगळवारी एकूण 2,479 रुग्ण आढळले. एकूण रुग्णांपैकी 2,053 रुग्ण एका बंगळुरात आढळले. याद्वारे कर्नाटकातील कोरोना संसर्गाचा दर 2.59 टक्के झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 95,391 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला आहे. आतापर्यंत एकूण 77 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
बंगळुरात शाळा दोन आठवडे बंद
बंगळूरमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी सुमारे 3 हजारांवर कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे बंगळुरातील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग दोन आठवडे रद्द केले आहेत. दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग होणार आहेत.