Latest

नवाब मलिक यांच्यासह सात जणांविरोधात हजार कोटींचा दावा

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची होर्डिंगद्वारे नाहक बदनामी केल्याप्रकरणी बँकेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व इतर सात जणांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

मलिक यांनी बँकेची बिनशर्त माफी मागून तशा आशयाची होर्डिंग्ज शहरात लावावीत अशी मागणी बँकेने केल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत न्यायमूर्ती रियाज छागला यांनी मलिक यांच्यासह अन्य प्रतिवादींना सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ तसेच मुंबई बँक घोटाळ्याचा तपासच झाला नाही, न्यायालयाचे ताशेरे अशा मथळ्याखाली दोन वृत्त एका दैनिकात प्रसिध्द करण्यात आली. त्या वृत्तांच्या आधारे मोठे बॅनर बनवून दोन होर्डिंग्ज नवाब मलिक यांनी मुंबईत 1 ते 4 जुलै दरम्यान झळकावले होते. मलिक यांच्या या कृत्यामुळे बँकेच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचला असून बँकेची प्रचंड बदनामी झाली आहे.

त्यामुळे नवाब मलिक यांनी बँकेची माफी मागावी व माफीनाम्याचे होर्डिंग्ज शहरात लावावेत अशी मागणी करत बँकेने अ‍ॅड. खिलेश चौबे यांच्या मार्फत मलिक व इतर सात जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 1 हजार कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकेची दखल घेत सहा आठवड्यात मलिक यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचे आदेश दिले व सुनावणी तहकूब केली.

SCROLL FOR NEXT