Latest

नवाब मलिक यांच्यासह तिघांवर मुंबई बँकेचा हजार कोटींचा दावा

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची बदनामी केल्याबद्दल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, दैनिक लोकसत्ता आणि वृत्तवाहिनी लोकशाही यांच्याविरोधात प्रत्येकी 1 हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा बँकेने दाखल केला आहे.

मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक देवदास कदम यांनी सांगितले की, मुंबै बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक असून बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटींवर पोहोचली आहे. एका आर्थिक संस्थेच्या बदनामीचा परिणाम संस्थेचेे ग्राहक, डिपॉझिटर्सवर होतो. मुंबै बँकेवर लाखो लोकांचे पोट अवलंबून आहे.

एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? म्हणून आम्ही मुंबई बँकेची बदनामी करणार्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर (एल) 21909 ऑफ 2021 – (द इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेड अ‍ॅण्ड अदर्स) आणि सूट नंबर (एल) 21935 ऑफ 2021 – (नवाब मलिक अ‍ॅण्ड अदर्स) या नोंदणी क्रमांकाप्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

माध्यमांशी बोलताना देवदास कदम यांनी सांगितले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक सभासद, ठेवीदार, आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी आदींचे योगदान आहे. मुंबै बँक ही मुंबईच्या सहकाराचे वैभव आहे. पण बँकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यांवर होत आहे. मुंबै बँकेच्या लौकिकास काळिमा फासण्याचे काम काही जणांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबै बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते विधाने करतील व बदनामीकारक बातम्या प्रसिध्द करतील हे अयोग्य आहे. त्यामुळेच हा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला.

कारवाईचा ठराव

मंगळवारी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही बँकेची बदनामी करणार्‍या संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. बँकेची नाहक बदनामी करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. अबु्रनुकसानीच्या दाव्यानंतर आता बँकेच्या वतीने फौजदारी दावादेखील दाखल करीत असल्याचे देवदास कदम यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT