Latest

नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली होती. त्याबाबत वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तिची दखल घेत आयोगाने मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.

चौकशीच्या बहाण्याने वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी 7 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.

अमली पदार्थप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास अटक झाल्यानंतर नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर द्वंद्व रंगले होते. दरम्यान, वानखेडे यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या कुटुंबावर करण्यात येत असलेल्या खासगी आरोपांबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे 26 ऑक्टोबर 2021 रोजी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत आयोगाने आदेश जारी केले.

एसआयटी स्थगित करण्यात यावी

वानखेडे यांच्या आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करीत होते. आयोगाने एसआयटीलाही स्थगिती दिली आहे. तसेच वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करावा, या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्तांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्‍याकडे तपास देऊ नये, वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा छळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी व या प्रकरणी सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचेच

भारतीय महसूल सेवेतील नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करतानाच वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता; परंतु उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता वानखेडे हे प्रथमदर्शनी अनुसूचित जातीचे आहेत, हे स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नोंदवले आहे. तसेच आयोगाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT