Latest

नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी सौदा आहे तरी काय?

Arun Patil

मुंबई ; पुढारी डेस्क : जी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरून प्रदीर्घ चौकशी करत ईडीने अखेर नवाब मलिक यांना अटक केली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आरोपी असलेल्या व्याजबट्ट्याच्या प्रकरणात मलिक यांच्याविरुद्ध ईडीने ही कारवाई केली. 9 नोव्हेंबर 2021 ते 23 फेब्रुवारी 2022 असा साधारण साडेतीन महिन्यांचा हा घटनाक्रम आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी सरदार शहावली खान आणि डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा फ्रंटमॅन मोहम्मद सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांच्याकडून नवाब मलिक यांनी अत्यंत स्वस्तात जमीन खरेदी केली, असा फडणवीस यांचा आरोप आहे.

सरदार खानला टाडा न्यायालयाने 2007 मध्ये आजन्म कारावास सुनावला, तर सलीम पटेलला 2007 मध्येच जमीन बळकावण्याच्या प्रकरणी अटक झाली आहे.

कुर्ल्यातील एनबीएस मार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही 2.80 एकर जमीन सॉलीड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ने फक्‍त 30 लाखांत खरेदी केली.

नवाब मलिक यांचे चिरंजीव फराज मलिक यांच्या सहीने हा व्यवहार झाला. मात्र 2019 मध्ये मंत्री झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ही कंपनी सोडली, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

या जमिनीच्या व्यवहाराचा भाग म्हणून मलिक कुटुंबीयांनी सरदार खानला 15 लाख रुपये आणि सलीम पटेलला 5 लाख रुपये दिले. ठरलेल्या 30 लाखांच्या व्यवहारापेक्षा 10 लाख कमी देण्यात आले. या जमिनीचा बाजारभाव 8 हजार 500 रुपये प्रति चौरस मीटर असताना मलिक कुटुंबीयांनी ही जमीन फक्‍त25 रुपये प्रति चौरस मीटर भावाने घेतली.

1992 साली भीषण बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सूत्रधार टायगर मेमनच्या गँगने ज्या टीमला शस्त्रास्त्रांचे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण दिले त्या टीममध्ये सरदार खान होता. त्यानेच मुंबई शेअर बाजारची आणि मुंबई महापालिकेची रेकी करून बॉम्ब कुठे ठेवायचे हे निश्‍चित केले. त्याच्याशीच 2005 मध्ये नवाब मलिक यांनी हा जमिनीचा व्यवहार केला. हा सरदार खान सध्या तुरुंगात आहे. याच व्यवहारातील सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकरचा अंगरक्षक राहिला आणि तिच्या सर्व जमिनींच्या व्यवहारांचे अधिकारपत्र तथा पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी त्याच्याच नावाने आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांच्या या आरोपानंतर ईडीने चौकशी सुरू करीत अखेर नवाब मलिक यांना अटक केली. फडणवीस यांच्या या आरोपांवर नवाब मलिक यांनी त्याच वेळी प्रत्युत्तरही दिले होते.

अंडरवर्ल्डच्या कुणाशीही आपण कुठलाही व्यवहार केलेला नाही. कुर्ल्यातील जमिनीवर गोडाऊन होते आणि ती जमीन सॉलीडस कंपनीने मुनीरा पटेलकडून भाडेतत्त्वावर विकत घेतली. मुनीरा पटेलच आमच्याकडे आल्या आणि जमीन विकण्याची इच्छा व्यक्‍त केली. या जमिनीची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेलच्या नावावर होती. त्याच्याशी व्यवहार करून आम्ही जमिनीची मालकी मिळवली.

शहावली तथा सरदार खानचे वडील या जमिनीच्या कम्पाऊंडवर वॉचमन होते. या कुटुंबाने जमिनीच्या रेकॉर्डवर आपले नाव आणले आणि 300 मीटर जागेवर मालकीचा दावा केला. जेव्हा आम्हाला हा प्रकार समजला तेव्हा हक्‍क सोडण्यासाठी आम्ही या खान कुटुंबास पैसे दिले.

कुर्ल्यातील जमीन खरेदीचा व्यवहार करणारी सॉलीड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ही कंपनी मलिक कुटुंबाने 1973 साली स्थापन केली. नवाब मलिक यांचे चिरंजीव अमीर नवाब मलिक आणि पत्नी मेहजबीन नवाब मलिक हे दोघे या कंपनीचे संचालक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT