बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा आग्यामोहोळाने अचानक हल्ला चढवून दंश केल्याने दुचाकीस्वार शेतक-याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना चिखली-खामगाव महामार्गावरील गारडगाव जवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जगन्नाथ नामदेव देवळे (वय ५८ रा.अंत्रज ता.खामगाव) असे मृताचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंत्रज येथील शेतकरी जगन्नाथ देवळे हे दुचाकीद्वारे खामगाव शहराकडे चालले होते. तीन कि.मी.अंतरावर गारडगाव फाट्याजवळील सिंधी नाल्यावरून त्यांची दुचाकी जात असतांना अचानक आग्यामोहोळाने त्यांच्यावर हल्ला केला. एकाचवेळी हजारो मधमाशांनी जीवघेणा दंश केल्याने देवळे हे कोणताही प्रतिकार करण्यास असमर्थ ठरले.
दूचाकी थांबवून ते जीवाच्या आकांताने धावले परंतू, मधमाशांनी पाठलाग सोडला नाही. अखेर आग्यामोहोळाच्या विषारी दंशामुळे बेशुद्ध होऊन ते रस्त्यावर निपचित पडले. सुमारे दिड- दोन तास मोहोळाच्या माशा त्यांच्या शरीराभोवती घोंघावत होत्या. मार्गावरून जाणा-या इतर वाहनधारकांनी दूरवर थांबून हा प्रकार बघितला परंतू मधमाशांच्या भितीमुळे कुणीही मदतीसाठी समोर येण्याचे साहस करू शकले नाही. ग्रामस्थांनी या घटनेबाबत पोलीस व प्रशासनाला कळवल्यानंतर, पोलीसांनी खामगाव नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाला घटनास्थळावर पाचारण केले. यावेळी अग्नीशमन दलाने पाण्याचे फव्वारे मारून मधमाश्यांना हटविले. मधमाशांच्या हल्ल्यात घायाळ झालेल्या जगन्नाथ देवळे यांना खामगावच्या उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा :