Latest

द्रष्टा राजा

अमृता चौगुले

समाजक्रांतिकारकाचे कार्य मानवी जीवन दुःखी-कष्टी करणार्‍या कुजक्या सामाजिक परंपरा उद्ध्वस्त करून नवजीवनाच्या प्रेरणांनी समाजात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याचे असते. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य तसेच होते. त्या कार्याचा मागोवा घेत असता सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांना आंग्ल कवी शेलीच्या 'Ode to the West Wind'  या कवितेची आठवण होते. ते म्हणतात, 'सामाजिक क्रांतीसाठी आसुसलेल्या एका ध्येयवेड्या कवीने बेभान होऊन ही कविता लिहिली आहे. रोगट आणि कुजलेल्या काळ्या-पिवळ्या पानांना सावडून दूर फेकणार्‍या आणि या धरतीवर नवजीवनाची बीजे फेकणार्‍या त्या वादळाचे स्वागत कवीने केले आहे. उद्याच्या विमुक्त जीवनाचा संदेश देणार्‍या या वादळाचे वर्णन हा कवी The trumpet of a prophecy  या शब्दांत करतो.

हे वादळ म्हणजे सर्वंकष क्रांतीचे प्रतीक होय. अशा प्रकारच्या वादळाने जगाच्या इतिहासात अधूनमधून मानवी देह धारण केलेले आहेत. जगातील क्रांतिकारकांच्या रूपाने अशा वादळांनी जगाला हादरे दिलेले आहेत. राजर्षी शाहू छत्रपती म्हणजे अशाच प्रकारच्या एका प्रचंड वादळी वार्‍याचे मानवरूप! रोगट आणि कुजलेल्या कर्मकांडांचे स्तोम माजविलेल्या आणि वर्णवर्चस्वाद्वारे सामाजिक गुलामगिरीची निर्मिती केलेल्या विचारांना लाथाडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या उदात्त विचारांना आणि शाश्वत मूल्यांना महाराष्ट्राच्या भूमीत रुजविण्याचा प्रयत्न या क्रांतिपुरुषाने हयातभर केला.'

आणखी एक विचारवंत, प्राचीन भारतीय संस्कृती व धर्म यांचे गाढे संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांना शाहू महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करताना चार्वाक दर्शनातील 'लोकसिद्ध राजा हाच ईश्वर' या तत्त्वाची प्रचिती येते. प्राचीन काळी बळी राजा हा असा 'लोकसिद्ध ईश्वर' होऊन गेला; आधुनिक काळात त्याच्याच तोडीचा 'लोकसिद्ध ईश्वर' म्हणजे छत्रपती शाहू महाराज, असे सांगून डॉ. साळुंखे लिहितात, 'या पृथ्वीवर प्रत्यक्ष व्यवहारात जो गोरगरिबांचे अश्रू पुशील, जो त्यांच्या पोटभर अन्नपाण्याची व्यवस्था करील, जो त्यांना शिक्षण देईल, जो त्यांना निकोप जीवन जगण्याची संधी मिळवून देईल, जो त्यांची प्रतिभा फुलविण्याला सहकार्य करील, जो त्यांच्या बाबतीत होणारा पक्षपात व अन्याय नाहीसा करील आणि जो माणूस या नात्याने त्यांना समतेची वागणूक देईल, तो आणि तोच त्यांचा ईश्वर होय.

छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्राचा व व्यक्तिमत्त्वाचा कण न् कण अशा ईश्वरत्वाच्या या कसोटीवर उतरत होता, यात शंका नाही. हे ईश्वरत्व आध्यात्मिक, धार्मिक, पारलौकिक, पारमार्थिक वा अतिमानवी स्वरूपाचे नव्हते. ते पूर्णपणे सामाजिक, नैतिक, ऐहिक, वास्तविक व मानवी पातळीवरचे होते, हे आपण आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. हे गूढ चमत्कार करणारे ईश्वरत्व नव्हते. ते माणूस असूनही माणूसपणाला मुकलेल्या लोकांना त्यांचे हिरावले गेलेले मानव्याचे सिंहासन पुन्हा मिळवून देणारे ईश्वरत्व होते, हेही विसरता येत नाही.'
डॉ. साळुंखे पुढे म्हणतात, 'पारलौकिक ईश्वर आम्हाला कधी भेटला नाही; पण लोकांमध्ये प्रत्यक्ष सिद्ध असलेला, लोकांच्या सुख-दुःखांना स्वत:ची सुख-दु:खे समजणारा, चिखलात रूतलेल्यांना बाहेर येण्यासाठी हात देणारा, तथाकथित ईश्वराकडून अपेक्षित असलेली सर्व कामे करणारा आमचा लोकसिद्ध शाहू राजा हाच आमचा ईश्वर, यात मात्र शंका नाही.'

शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे विचार काळाच्या कसोटीस उतरले आहेत. त्यांच्या हयातीत त्यांच्या विचारांची वरिष्ठवर्गाने हेटाळणी केली; तर तथाकथित विचारवंतांनी उपेक्षा केली. एवढेच नव्हे तर सामाजिक स्वातंत्र्याचा विचार मांडणार्‍या या विभूतीवर 'स्वजनद्रोहाचा', 'स्वराज्यद्रोहाचा'ही आरोप करण्यात या विचारवंतांना विवेक पारखा झाला. त्या काळी राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे धुरीणत्व करणार्‍या थोर थोर देशभक्तांनाही सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ ही राष्ट्रीय मुक्तीची चळवळ वाटत नव्हती. या त्यांच्या मानसिकतेमुळेच अस्पृश्यतेचा निषेध करणारा साधा ठरावसुद्धा काँग्रेससारख्या राष्ट्रीय संघटनेच्या व्यासपीठावर कित्येक वर्षे मंजूर होऊ शकला नव्हता. देश पारतंत्र्यात असल्याने राजकीय स्वातंत्र्याची निकड ज्या मंडळींना अधिक वाटत होती, त्यांना आपल्याच देशबांधवांच्या सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यास स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्ताची वाट पाहायला लागावी, ही बाब दुर्दैवी होती.

या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांच्या विचारांची उपेक्षा होणे, यात नवल नव्हते. पण आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा काळ लोटला तरी या विचारांची अंमलबजावणी जशी व्हायला हवी, तशी ती होत नाही, ही खरी शोकांतिका आहे. याचा असा अर्थ होतो की, उपरोक्त विचार जेवढा 75 वर्षांपूर्वी सत्य आणि निकडीचा होता, तसा तो आजही आहे. आणि आजच्या ग्रामीण भागातील स्त्रिया, भूमिहीन, शेतकरी, मोलमजुरी करणारे कष्टकरी आणि दलित समाज यांच्या प्रश्नांकडे डोळस नजरेने पाहिल्यास या विचाराची लढाई आणखी बराच काळ करावी लागेल, या वस्तुस्थितीचे दर्शन झाल्याशिवाय राहात नाही. ही लढाई जिंकली जाईपर्यंत शाहूंचा विचार सतत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे.

महात्मा फुले यांचा विचार, राजर्षी शाहूंचा विचार अथवा डॉ. आंबेडकरांचा विचार या सर्वांचे स्थलकाल परिस्थितीनुसार प्रकटीकरण वेगवेगळ्या स्वरूपात झाले असेल; पण त्यांच्या अंतरंगातील सूत्र एकच होते. या सर्व थोर समाजक्रांतिकारकांचा वैचारिक आकृतिबंध एकच होता आणि या आकृतिबंधातील 'विषयपत्रिका'ही एकच होती. या विषयपत्रिकेवरील कार्यक्रम स्थल-काल परिस्थितीपरत्वे काहीसे भिन्न-भिन्न भासले तरी त्यांच्या मुळाशी एकाच उद्दिष्टाचे सूत्र होते आणि ते म्हणजे, सामाजिक समता व न्याय यावर अधिष्ठित असा शोषणमुक्त समाज निर्माण करणे, वरिष्ठ व बलिष्ठ वर्गाने लादलेल्या मानसिक व बौद्धिक गुलामगिरीतून मागासलेल्या वर्गाची मुक्तता करणे, त्यासाठी त्या वर्गास सामाजिक बंडास उद्युक्त करणे.

महात्मा फुले काय, महर्षी शिंदे काय, डॉ. आंबेडकर काय अथवा कर्मवीर भाऊराव पाटील काय, या सर्वांची विषयपत्रिका एक असणे यात नवल काहीच नव्हते. कारण, ते सर्वजण मागासवर्गीयांचे प्रतिनिधी होते; परंतु राजकुलोत्पन्न शाहू महाराजांचीही विषयपत्रिका त्यांच्यासारखीच असावी, हा विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक चमत्कार मानावा लागेल. प्रसिद्ध संशोधक गेल ऑम्वेेट यांनी आपल्या लेखाच्या प्रारंभी एका अमेरिकन इतिहासकाराचे भाष्य नमूद केले आहे. त्या लिहितात, 'उत्तर भारतातील जमीनदार आणि संस्थानिक यांच्याशी परिचित असलेल्या एका अमेरिकी इतिहासकाराला शाहू महाराजांच्या भूमिकेचे फार आश्चर्य वाटले.' तो म्हणाला, 'इतका मूलगामी सामाजिक दृष्टिकोन फुले यांच्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीत आढळणे हे समजण्यासारखे आहे; पण शाहू महाराजांसारख्या एका राजामध्ये तो दिसून येणे ही गोष्ट थक्क करणारी आहे!'

खरोखरच बालपणापासून राजवैभवात वाढलेल्या आणि छत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या या राजास समाजक्रांतीचा झेंडा खांद्यावर घेण्याची काय आवश्यकता होती? त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेदोक्त प्रकरणानंतर त्यांच्यामधील अन्यायाविरुद्ध लढणारी बंडखोर वृत्ती जागी झाली हे खरे; पण त्यावेळी त्यांनी तयार केलेली विषयपत्रिका वेदोक्तातील ब्रह्मवृंदांच्या शरणागतीने व त्यांच्या विजयाने अंतर्धान पावावयास हवी होती; पण तसे झालेले दिसत नाही. उलट त्यांच्या विषयपत्रिकेवर मागासवर्गीयांच्या आरक्षणापासून अस्पृश्यता निवारणापर्यंत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून क्षात्र जगद्गुरूंच्या निर्मितीपर्यंतच्या नानाविध विषयांची यादी वाढत गेल्याचे दिसून येते. वेदोक्त प्रकरणात खांद्यावर घेतलेला समाजक्रांतीचा झेंडा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत खाली ठेवला नाही.

सर्वच काळातील महापुरुषांवर स्थल-काल परिस्थितीच्या मर्यादा पडलेल्या असतात. या मर्यादांनी वेढलेल्या अवस्थेतच महापुरुष समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु सर्वांच्या मर्यादा सारख्याच असतात असे नाही. महात्मा फुले यांच्या मर्यादा वेगळ्या, शाहू महाराजांच्या मर्यादा वेगळ्या. प्रसंगी अर्धपोटी राहून महात्मा फुले यांनी तुटपुंज्या साधनांनिशी सुधारणा चळवळ चालू ठेवलेली, तर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या खजिन्याची ताकद या सुधारणा चळवळीच्या मागे उभी केली. वरवर पाहता महात्मा फुले यांच्यावर पडलेल्या परिस्थितीच्या व साधनांच्या मर्यादा स्पष्टपणे द़ृगोचर होतात; पण ज्या राजेपदामुळे महाराजांकडे साधनांची हवी तेवढी उपलब्धता निर्माण झाली होती, तेच राजेपद ही त्यांची सर्वात मोठी मर्यादा होती. ते एक प्रकारचे जाचक बंधनच होते. फ्रेझरसाहेबांनी अचूकपणे या बंधनावर बोट ठेवले आहे.

ते म्हणतात, 'सत्तेवर असल्यामुळे आपली धोरणे अमलात आणण्यासाठी शाहू महाराजांकडे मोठी साधने होती. तथापि, शाहू महाराजांचे स्थान जितके मोठे होते, तितकीच परिस्थितीची कोंडी फोडायला कठीण अशी होती आणि तितकाच अधिक त्रास त्यांना संघर्ष करताना भोगावा लागलेला होता.' महात्मा फुले यांच्याकडे भले संपत्ती नसेल, सत्ता नसेल; पण ते ब्रिटिश इंडियातील स्वतंत्र नागरिक होते. प्रसंगी तर ते इंग्रज राज्यकर्त्यांवर लेखणीचे कठोर हल्ले करू शकत होते; त्यांचे वाभाडे काढू शकत होते; त्यांच्या चुकांचे व गैरकृत्यांचे पाढे वाचू शकत होते. मात्र, महाराजांचे राजेपद त्यांना यापैकी काहीही करू देऊ शकत नव्हते.

इंग्रज सार्वभौम सत्तेने आखून दिलेल्या अधिकाराच्या रिंगणातच त्यांना आपल्या राजसत्तेचा बहुजनांच्या उद्धारासाठी जास्तीत जास्त कौशल्याने वापर करायचा होता; तो असा की, मांडलिक संस्थानिक या नात्याने सार्वभौम सत्तेशी असलेल्या राजनैतिक संबंधांना थोडीही इजा पोहोचता कामा नये, ही तारेवरची कसरत होती. हिंदुस्थानातील अन्य शेकडो संस्थानिक आपल्या राजविलासात रममाण होऊन राजवैभवाचा सुखेनैव उपभोग घेत असताना हा मराठी राजा गळ्यात 'कवड्याची माळ' घालून गरिबांच्या कल्याणासाठी ही कसरत आयुष्याच्या अखेरीपर्यंत करीत राहिला. विशेष म्हणजे या कसरतीची कोणी त्याच्यावर सक्ती केलेली नव्हती; आपणहून त्याने या कसरतीचे 'व्रत' स्वीकारलेले होते.

धनंजय किर यांनी म्हटले आहे, 'खरोखरच बुद्धानंतर भारतात राजर्षी शाहू हाच एक असा राजा होऊन गेला की, जो हरिजन व गिरिजन यांच्या पंगतीस प्रेमाने, निर्भयपणे व उघडपणे जेवला.' गौतम बुद्धाची मानव जातीविषयीची व्यापक करुणा व वैश्विक बंधुत्वाची भावना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांतून आणि कृतींतून व्यक्त झाली होती; विचारांपेक्षाही ती कृतींतून अधिक प्रकट झाली होती, हा त्यांच्या कार्याचा विशेष मानावा लागेल.

कुर्मी क्षत्रियांच्या परिषदेत शाहू महाराजांनी जे भाषण केले, तो त्यांच्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा उत्कृष्ट नमुना होता; त्याहून महत्त्वाचे म्हणजे या भाषणाच्या अखेरीस महाराजांनी सर्वशक्तिमान परमेश्वराला उद्देशून जी प्रार्थना केली, ती त्यांच्या ठिकाणी वास करणार्‍या विश्वबंधुत्वाच्या भावनेची, व्यापक करुणेची द्योतक होती. या प्रार्थनेद्वारे ते मागणी करतात, 'हे परमेश्वरा! आमच्या देशातील लोकांना सुबुद्धी देऊन त्यांच्या अंत:करणात ज्ञानाचा प्रकाश पाड, आम्ही सर्व माणसे सद्गुणी चिरायू पुत्र होऊन बंधुप्रेमाने राहू. दुसर्‍याचे दु:ख ते आपले दु:ख व दुसर्‍याचे सुख तेच आपले सुख, असा आमचा समज होऊ दे.

सर्वजण मिळून शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करून या संसाराला स्वर्गधाम बनवूया.' महाराजांच्या उपरोक्त प्रार्थनेतील विचार पसायदानातील 'जे खळाची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो! भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचे॥' या ओवीतील वैश्विक बंधुत्वाच्या विचाराशी नाते सांगणारा आहे. हा विचार सामान्य नाही. तो जगातील सर्व महात्म्यांचा विचार आहे. अखिल मानवजातीच्या सौख्याचे व कल्याणाचे रहस्य या विचारात साठवलेले आहे.

'महात्मा' हाही 'माणूस' असतो; तो 'देव' नसतो, याचे भान समाजाने ठेवावयास हवे; पण बहुधा हे घडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही 'शिवा'चे अवतार मानून 'अवतारी' पुरुष करून टाकले तर त्यामुळे त्यांच्यातील 'माणूस' पुसला जातो, याचे भान आम्हाला राहात नाही. महापुरुषांना आम्ही एकदा 'देवा'च्या स्थानावर स्थापन केल्यावर आमचे काम सोपे होते. त्यांच्या जयंत्या-मयंत्या साजर्‍या करणे, त्यांचे पुतळे उभारणे, एवढेच उत्सवी काम शिल्लक उरते आणि ते मोठ्या उत्साहात पार पाडले जाते. मग ते शिवछत्रपती असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू असतील अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील; पण हे महापुरुषही तुमच्या-आमच्यासारखी हाडामांसाची माणसे होती आणि 'माणूस' असूनही त्यांनी पारलौकिक देवांनीही कधी केली नाहीत अशी मानवजातीच्या कल्याणाची अद्भुत कामे केली, ही शास्त्रीय दृष्टी आम्ही स्वीकारत नाही. कारण, अशी दृष्टी स्वीकारण्यात त्या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण व अंमलबजावणी करण्याची अप्रत्यक्ष नैतिक जबाबदारी आमच्यावर पडते.

हे सत्य आहे की, तुम्हा-आम्हा सर्वांनाच महापुरुष होता येणार नाही; महात्मा फुले – राजर्षी शाहू बनता येणार नाही. हेही मान्य करू की, त्यांचे विचार 100 टक्के आपणास आचरणात आणता येणार नाहीत; पण त्यांच्या कार्यातील एखादा टक्का तरी विचार अमलात आणता येईल की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील आपल्या हजारो ओव्यांतून जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मांडले, मानवी जीवनाचा अर्थ विशद करून सांगितला, सत्कर्माचे अनेक सन्मार्ग दाखवून दिले आणि त्याप्रमाणे वागण्याचा आपल्या बांधवांना उपदेश केला; पण त्याप्रमाणे सर्वस्वी वागणे सामान्यजनांना सोपे नाही याची नामदेवांसारख्या ज्ञानी संताला कल्पना होती आणि म्हणूनच ज्ञानदेवांमागून येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले आहे, 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी॥' या नामदेव महाराजांच्या उपदेशाला अनुलक्षून तुम्ही-आम्ही, फुले-शाहूंच्या समस्त चाहत्यांनी, त्यांची एक तरी उक्ती 'अनुभवावी'
अशी अपेक्षा या ठिकाणी केली तर ती अस्थानी ठरू नये.

विचारांची लढाई जिंकली जाईपर्यंत राजर्षी शाहूंचा विचार सतत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचारांचे प्रकटीकरण स्थलकाल परिस्थितीनुसार वेगवेगळ्या स्वरूपात झाले असेल; पण त्यांच्या अंतरंगातील सूत्र एकच होते. या सर्व थोर समाजक्रांतिकारकांचा वैचारिक आकृतिबंध एकच होता आणि या आकृतिबंधातील विषयपत्रिकाही एकच होती. सामाजिक समता व न्याय यावर अधिष्ठित असा शोषणमुक्त समाज निर्माण करणे, हे त्यांच्या उद्दिष्टांचे सूत्र होते.

-डॉ. जयसिंगराव पवार
ज्येष्ठ इतिहास संशोधक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT