Latest

दै.‘पुढारी’च्या पाठबळाने कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचे शिवधनुष्य शक्य

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या राज्य वकील परिषदेचे नूतन अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची सोमवारी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. कोल्हापूर खंडपीठाच्या आजवरच्या लढ्यात दै. 'पुढारी'चे योगदान मोलाचे राहिले आहे. कोल्हापूरला मिळालेल्या संधीचे सोने करत अध्यक्षपदाच्या काळात खंडपीठ अस्तित्वात आणण्याचा निर्धार आहे. दै. 'पुढारी'च्या पाठबळामुळे कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचे शिवधनुष्य शक्य आहे, असाही अ‍ॅड. घाटगे यांनी विश्वास व्यक्त केला.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या राज्य वकील परिषदेच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विवेक घाटगे यांची रविवारी एकमताने निवड झाली. तब्बल 24 वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्याला संधी मिळाल्याने अ‍ॅड. घाटगे यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विजय माळेकर, अ‍ॅड. संजय मुळे यांच्यासमवेत दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी, अ‍ॅड. घाटगे यांनी दै. 'पुढारी'चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे जबाबदारी निश्चित पेलू

अ‍ॅड. घाटगे म्हणाले, शहर, जिल्ह्याच्या विकासात्मक कार्यात दै. 'पुढारी'चे भरीव योगदान आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकारांसह सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या लढ्यात दै.'पुढारी' अग्रभागी राहिला आहे, याचा कोल्हापूरकरांना अभिमान आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदाच्या रूपाने कोल्हापूरला दुसर्‍यांदा मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न आहे. दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाठबळामुळे हे शिवधनुष्य आम्ही निश्चित यशस्वीपणे पेलू, असाही विश्वास अ‍ॅड. घाटगे यांनी व्यक्त केला.

मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्तीनंतर खंडपीठ स्थापनेला गती येईल

यावेळी बोलताना मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची येत्या काही दिवसांत नियुक्ती शक्य आहे. कोल्हापूर सर्किट बेंच, खंडपीठाच्या स्थापनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय केंद्रीय राज्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. कोल्हापूर सर्किट बेंच, खंडपीठासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाच्या विषयाला गती येईल.

शेंडा पार्कातील जागेबाबत विशेष बैठक घेण्याची गरज : डॉ. जाधव

खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाद्वारे मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी आपण स्वत: चर्चा केली आहे. पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलाविण्याबाबतही आपण विनंती केली आहे, असेही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते अ‍ॅड. घाटगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

SCROLL FOR NEXT