नवी दिल्ली/तिरुवनंतरपूरम : वृत्तसंस्था : भारतामध्ये मोठा बनावट क्रिप्टो करन्सी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जवळपास 900 जणांची फसवणूक झाली आहे. घोटाळा 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते.
नव्या क्रिप्टो करन्सीच्या नावावर लोकांनी गुंतवणूक केली आणि त्यातून ही फसवणूक झाली. सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) सूत्रांना या घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली. 'आयसीओ' अर्थात 'इनिशियल कॉईन ऑफरिंग'च्या नावाखाली हा गैरप्रकार घडला आहे. फसलेल्या बहुतांशांनी 2020 मधील लॉकडाऊनच्या कालावधीत मॉरिस कॉईन हे बनावट कॉईन खरेदी केले होते.
'ईडी'ने देशात ठिकठिकाणी या घोटाळ्यासंदर्भात छापेमारीही केली. केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत छापे घालण्यात आले होते. बंगळूरमधील 'लाँग रिच टेक्नॉलॉजीज्' आणि 'मॉरिस ट्रेडिंग सोल्युशन्स', 'उन्नी मुकुंदन फिल्म्स' या प्रतिष्ठानांवरही 'ईडी'ने छापे घातले होते.
देश सोडून फरार
केरळमधील निषाद हा 31 वर्षांचा युवक या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असून, तो देश सोडून फरार झाल्याचेही समोर आले आहे. त्याच्याविरोधात आधीच 'मनी लाँडरिंग'ची काही प्रकरणे सुरू आहेत. घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान 'ईडी'ने एका दाक्षिणात्य अभिनेत्याच्या घरावरही छापा घातला होता. अभिनेत्याने या घोटाळ्याबाबत कानावर हात ठेवले होते.
कोईम्बतूर येथील 'फ्रँक एक्स्चेंज'मध्ये मॉरिस कॉईन यादीत समाविष्ट करण्यात आले होते. 10 मॉरिस कॉईनची किंमत 15 हजार रुपये होती. मॉरिस कॉईन खरेदी करणार्याला एक 'ई-वॉलेट'ही भेटवस्तू म्हणून देण्यात आले होते. प्रवर्तकाने या क्रिप्टो करन्सीची किंमत येत्या काही दिवसांत प्रचंड वाढणार आहे, अशी थाप देऊन गुंतवणूकदारांना गंडा घातला.
पैसा 'रिअल इस्टेट'मध्ये
गुंतवणूकदारांकडून गंडविण्यात आलेली रक्कम घोटाळेबाजांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचेही 'ईडी'च्या तपासाअंती समोर आले आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतील खासगी प्रकल्पांत सर्वाधिक गुंतवणूक यातून झाली आहे.