मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : देशात भाजपविरोधी आघाडीची तयारी सुरू झाली असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यासंदर्भात रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही पवार यांची भेट घेतली होती.
देशात परिवर्तनाची गरज आहे. देशाला मजबूत करायचे आहे. लोकशाहीसाठी लढायचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसतील. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातून जो विचार, आवाज निघतो, तो देशात यशस्वी होतो, अशी भूमिका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मुंबईत मांडली. दरम्यान, सुडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले.
राव यांनी उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. यावेळी उभयतांत देशाच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर राव आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. केसीआर म्हणाले, उद्धव ठाकरेंना भेटून देशाच्या विकासाबाबत, राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली.
तेलंगणा – महाराष्ट्र राज्यातील सहकार्य वाढविण्यासोबतच आमची अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आमचे बहुतांश मुद्द्यांवर एकमत झाले आहे. दोन नेते भेटतात, त्यावेळी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते. यापुढे देशाच्या विकासासाठी, देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी, धोरण बदलावरही आम्ही चर्चा केली. या सर्व विषयांवर आमचे एकमत झाले आणि आम्ही एकजूट आहोत.
काही दिवसांतच हैदराबाद इथे पुन्हा चर्चा होईल. मग पुढचा रस्ता स्पष्ट होईल. देशात परिवर्तनाची गरज आहे. देशातील युवा मंडळींना घेऊन काम करायला हवे. देशाचे वातावरण खराब करायला नको. भारताला मजबूत करावे, अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करू, असे राव यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. केंद्राने हे बंद करावे. अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही केसीआर यांनी मोदी सरकारला दिला.
सुडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे : उद्धव ठाकरे
देशात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरू झाल्या तर देशाचे भवितव्य काय? आज देशातील वातावरण गढूळ होत चालले आहे. सुडाचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. सुडाचे राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सुडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले.
ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार, अशी चर्चा होती. तो दिवस आज उजाडला. छत्रपती शिवाजी महाराजांची शनिवारी जयंती होती आणि रविवारी राव यांच्याशी भेट झाली. ही एक सदिच्छा भेट होती. पण आजच्या बैठकीबाबत लपवण्यासारखे काहीही नाही. आत एक, बाहेर वेगळे असे आम्ही करत नाही. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यांत चांगले वातावरण राहायला हवे.
संपूर्ण देशात राज्ये शेजारधर्म विसरली आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज देशाचा विचार करायला पाहिजे. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. देशातील राजकारण, विकासकामांवर चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. आता सुरुवात झाली आहे. भविष्यात आणखी चर्चा होतील. आकार-उकार यायला थोडा वेळ लागेल. देशाच्या मूलभूत प्रश्नांऐवजी, दुसर्याला बदनाम करण्याची व्यवस्था तयार झाली आहे. ती बदलण्यासाठी आम्ही एक दिशा ठरवली आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करू, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.