Latest

देवेंद्र फडणवीस : सेनेची सत्ता उधळण्यासाठी मावळ्यांप्रमाणे कामाला लागा

Arun Patil

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे सरकार हे असुरी, जुलमी, जगण्याचा हक्क हिरावून घेणारे सरकार आहे, शिवसेनेची सत्ता उधळून लावण्यासाठी मावळ्यांप्रमाणे कामाला लागा, अशी हाक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात शिवजयंतीच्या व्यासपीठावरून दिली.

अर्थात आघाडीचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस म्हणाले, भगवा हा त्यागाची आठवण करून देतो, त्याच त्यागातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जुलमी शासनावर, असुरी शक्तीवर विजय मिळविण्यासाठी बारा बलुतेदार, मावळ्यांमध्ये पौरुष जागे करून स्वराज्याची निर्मिती केली.

तेच पौरुष आता पुन्हा एकदा जागृत करण्याची गरज आहे. हा भगव्याचा अलखपुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल, आमच्या रक्तातील छत्रपतींचे अंश स्फुल्लिंग पावेल आणि त्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात लढत, गरीब-वंचितांना न्याय देण्यासाठी, राज्यात न्यायाचे राज्य स्थापन करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू या, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते. तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण केले. शिवज्योतीला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर मैदानातील सोहळ्यात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर अन्यायकारी असुरी शक्तीवाले सरकार अशी अप्रत्यक्षरीत्या टीका केली. हे सरकार, महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उधळवून लावण्यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे कामाला लागण्याचा सल्लाही भाजप कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, संदीप लेले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलावपाळी आणि कार्यक्रमस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. सकल मराठा समाजातर्फे पहिल्यांदाच अशाप्रकारे फुलांचा वर्षाव करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवज्योत संपूर्ण ठाणे शहरात फिरविण्यात आली. त्यात अडीचशेहून अधिक रिक्षा आणि बाईकस्वार सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने चिंतामणी चौकात प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

शिवजयंती हायजॅक

गेल्या चार वर्षांपासून ठाण्यातील सकल मराठा समाज आणि सकल क्रांती मोर्चातर्फे पक्षविरहित शिवजयंती साजरी केली जात होती. यावर्षी त्या प्रथेला बगल देत भाजपने संपूर्ण शिवजयंती हायजॅक करीत संपूर्ण व्यासपीठावर भाजप नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकार्‍यांनी ताबा घेतला होता. मराठा कार्यकर्त्यांनाही व्यासपीठावर सोडण्यात येत नव्हते. या व्यासपीठावर अमराठी, परप्रांतीयांच्या हस्ते आमदारांचे स्वागत करून मराठा समन्वयक, कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि स्थानिक नगरसेविका तथा उपमहापौर पल्लवी कदम यांची नावेही निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आली. परिणामी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT