Latest

देवेंद्र फडणवीस म्हणाले दारूची दुकाने सुरू, मग मंदिरेच बंद का?

Arun Patil

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : जेवढी गर्दी बार, दारू दुकानांमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे? राज्य सरकारने भक्‍तांसाठी व अर्थकारण सुरू राहण्यासाठी मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे बोलताना केली.

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत. आम्हाला कुठेही देव भेटतो. मंदिरे केवळ धार्मिक कारणासाठी उघडी ठेवा असे आम्ही म्हणत नाही, तर अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे.

हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. मंदिरांवर फार मोठे अर्थकारण अवलंबून असते. अर्थकारण सुरळीत होण्यासाठी म्हणून मंदिरे उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकरकची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता, मात्र मंदिरे बंद ठेवता, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

शाळांबाबतही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्‍चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत, असा आरोपीही त्यांनी केला.

यावेळी खा. रणजित निंबाळकर, खा. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. रणजितसिंह मोहिते- पाटील, आ. विजयकुमार देशमुख, आ. राहुल कूल, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, आ. गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT