Latest

दीर्घ श्वसन करण्याचे हे आहेत फायदे

Arun Patil

तणावमुक्तीसाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे नियमित व्यायामाचा फायदा मानसिक आरोग्यासाठीही होतोच. व्यायामातील दीर्घ श्वसनाचाही तणावमुक्तीसाठी फायदा होतो. रोज काही मिनिटे दीर्घ श्वसन केल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. मन आणि शरीरालाही आराम मिळतो. त्यामुळे झोपही चांगली लागते. श्वसन योग्य प्रकारे होणेही महत्त्वाचे आहे. श्वसन आणि आरोग्य यांचा दृढ संबंध असल्याने योग्य प्रकारे श्वसन होणे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दीर्घ श्वसनाचे अनेक फायदे होतातच. दीर्घ श्वसन योग्य प्रकारे कसे केले पाहिजे आणि त्याचे काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

दीर्घ श्वसन कसे करावे?

आराम किंवा सुखासनात बसावे अथवा झोपावे. नाकाने हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात करावी. पोट हवेने भरले पाहिजे. नाकाने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. ही क्रिया करताना एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवावा. हळूहळू श्वास घेताना पोटात हवा भरली जाण्याची क्रिया जाणवू द्या. तसेच श्वास सोडताना पोट खाली जाते, त्याचीही जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा पोटावरील हात हा छातीवरील हाताच्या तुलनेत अधिक वर येतो.

फायदे कोणते?

चुकीच्या पद्धतीने बसल्यास श्वासही चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेण्याची क्रिया करतो, तेव्हा शरीर आपोआपच मणकाही ताठ करू लागतो. दीर्घ श्वसन केल्याने एंडोमॉर्फिन मुक्त होते. एंडोमॉर्फिन चांगले हार्मोन असते. ते शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.

दीर्घ श्वसन करतो तेव्हा छातीचा भाता वरखाली होतो, त्यामुळे रक्ताभिसरणाला प्रोत्साहन देत शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे व्यक्तीच्या रक्तामध्ये जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन वाढल्याने ऊर्जेच्या पातळीतही वाढ होते.

दीर्घ श्‍वसन केल्याने शरीरातील आम्लता कमी होते. तणावामुळे शरीरातील आम्लाच्या प्रमाणातही वाढ होते. श्वास घेतल्याने तणावही कमी होतो. त्यामुळे पित्तप्रकोप होण्याचे प्रमाणही कमी होते. कार्बनडाय ऑक्साईड हे नैसर्गिक विषारी टाकाऊ घटक असतात. श्वासातून हे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

याखेरीज दीर्घ श्वसनामुळे पचनतंत्रासह शरीरातील सर्वच अवयवांना जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य चांगल्या प्रकारे होते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप राग येतो, तो थकलेला असतो किंवा घाबरलेला असतो तेव्हा त्याचे स्नायू कडक होतात आणि वरवर अपुरा श्वास घेतला जातो.

काही वेळा श्वास थांबतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. दीर्घ श्वसनाने ही सर्व प्रक्रिया उलट करून शरीर आणि मन शांत करण्यास मदत होते. नियमित व्यायामामध्ये दीर्घ श्वसनाचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदतच होते.

डॉ. भारत लुणावत

SCROLL FOR NEXT