Latest

दीपावली झाली विश्वव्यापी!

अमृता चौगुले

'वसुधैव कुटुम्बकम्' असे सांगणार्‍या भारतीय संस्कृतीमधील अनेक सणही आता पृथ्वीच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले आहेत. त्यामध्ये अर्थातच 'तमसो मा ज्योतिर्गमय' या वैदिक प्रार्थनेचे सुंदर प्रतीक असलेल्या दीपावलीचाही समावेश आहे. कोरोना महामारीच्या अंधःकारमय कालखंडात ही दिवाळी ( दीपावली ) आशेचा नवा प्रकाश घेऊन आली आहे. तिचे हे विश्वव्यापी रूप…

दीपावली म्हणजे प्रकाशाचा, चैतन्याचा महोत्सव. दिवाळीला आपल्याकडे 'सणांचा राजा' असे म्हटले जाते इतके या सणाचे महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमधील या सणाची व्याप्ती आता केवळ भारताच्या सीमेपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण जगभर सध्या वेद-उपनिषदे, भगवद्गीता, योगविद्या, आयुर्वेद व भक्तिमार्गाचा जसा प्रसार झाला आहे तसाच भारतीय सणांचाही प्रसार झालेला आहे. भारतीय लोकही सध्या जगभर मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. त्यामुळे भारतातील दीपावलीचा सणही अनेक देशांमध्ये पोहोचलेला आहे. आज दीपावलीचा मुख्य दिवस असून तो भारताप्रमाणेच जगभर तितक्याच उत्साहाने साजरा होत आहे.

आपल्याकडे दीपावलीची सार्वजनिक सुट्टी असते तशीच नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियासारख्या अनेक देशांमध्येही असते. आता अमेरिकेतही दिवाळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. या देशांमध्येही आपल्यासारखीच दारात रांगोळी, दिव्यांचा झगमगाट, फराळ आणि मिठाई, आकाश कंदील यांच्यापासून आतषबाजीसारखी 'एवंगुणविशिष्ट' दिवाळी साजरी केली जात असते.

अमेरिका ः अमेरिकेत भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या देशात चौथ्या क्रमांकावरील सर्वात मोठी लोकसंख्या हिंदूंची आहे. भारतासह मलेशिया, इंडोनेशिया, बांगला देश, सिंगापूर, कॅनडा अशा अनेक देशांमधून आलेले हिंदूही अमेरिकेत आहेत. तसेच अनेक स्थानिक अमेरिकन लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकारही केलेला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या काळात तिथे दीपावलीचा सणही अधिक उत्साहाने साजरा केला जात असतो. त्याचे प्रतिबिंब अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रावरही पडलेले दिसून येते. अमेरिकेतील अनेक राजकीय नेते दिवाळी उत्सवात सहभागी होत असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'व्हाईट हाऊस'मध्येही दरवर्षी दीपावली साजरी होत असते. ही प्रथा सन 2003 मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कारकिर्दीत सुरू झाली. अर्थात पहिल्या उत्सवावेळी स्वतः बुश उपस्थित नव्हते; पण त्यानंतरच्या काळात स्वतः राष्ट्राध्यक्ष या उत्सवात सहभागी होऊ लागले. बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प दिवाळीच्या उत्सवात आवर्जून उपस्थित राहत आले. अमेरिकेच्या संसदेतही नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी अनेक संसद सदस्य, बायडेन सरकारमधील अधिकारी वर्ग सहभागी झाला होता. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंधःकारमय काळानंतर ही दिवाळी आशेचा नवा प्रकाश घेऊन येणारी ठरली असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

ब्रिटन ः ब्रिटनमध्ये तर भारताबाहेरील सर्वात मोठा दिवाळी उत्सव सुरू झाला आहे. लिसेस्टरशायर या शहरात गेल्या रविवारपासूनच सात दिवसांचा दिवाळी महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात पाच लाख लोक सहभागी होतील, असे तेथील महापौर पीटर सॉल्सबी यांनी म्हटले आहे. या ठिकाणी दोन अतिशय भव्य स्क्रीन्स लावण्यात आले असून लेसर शो, नृत्य, संगीत, धार्मिक कार्यक्रम, नृत्यनाटिका, 'व्हील ऑफ लाईटस्', खाद्यपदार्थांचे स्टॉल आदी कार्यक्रमांची यामध्ये रेलचेल आहे. राजधानी लंडनसह अनेक शहरांमध्येही दिवाळीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया ः या देशात ब्रिस्बेन आणि मेलबोर्न शहरांमध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे विशेषतः या शहरांमध्ये दिवाळी अगदी भारतासारखीच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा दिवाळी उत्सव मेलबोर्नच्या फेडरेशन स्क्वेअर या प्रसिद्ध चौकात साजरा होतो. आतषबाजी, दिव्यांचा झगमगाट, पारंपरिक नृत्य-गायनाचे कार्यक्रम याठिकाणी व ऑस्ट्रेलियात अन्यही शहरांमध्ये पाहायला मिळतात.

दक्षिण आफ्रिका ः आफ्रिकेतील अनेक देशांमध्येही हिंदू धर्माचा प्रसार झालेला आहे. त्यामध्ये अगदी घानासारख्या देशाचाही समावेश आहे. स्थानिक लोक गणेशोत्सव, दिवाळीसारखे सण अगदी भारतीयांसारखेच साजरे करतात. दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाचे लोक सुमारे दहा लाख इतके आहेत. स्थानिक लोकांसमवेत हे लोकही दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. जोहान्सबर्गमधील दिवाळीचा उत्साह तर पाहण्यासारखाच असतो. भारतीय मिठायांबरोबरच स्थानिक खाद्यपदार्थ, मेंदी, रांगोळी, मातीचे दिवे व फटाक्यांपर्यंत अनेक वैशिष्ट्ये तिथे पाहायला मिळतात.

इंडोनेशिया ः या देशात अद्यापही भारतीय संस्कृतीचा प्रभाव टिकून आहे. विशेषतः बाली बेटावर तर मूळ इंडोनेशियन हिंदू बहुसंख्य आहेत. तिथे दिवाळीही मोठ्या उत्साहात साजरी होते. नवे कपडे, फटाके, मिठाई असा सर्व थाट भारताप्रमाणेच तिथेही असतो. तिथे पाण्यात तरंगते दिवे सोडले जातात. लोक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि मिठाई वाटतात.

संयुक्त अरब अमिरात ः जर तुम्ही दिवाळीच्या काळात दुबईत असाल, तर तो काळ सर्वात संस्मरणीय ठरू शकतो. दुबईत पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. दुबईची बाजारपेठ खास दिवाळीसाठी सजलेली असते आणि लोक यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात सोनेही खरेदी करतात. अनेक मॉल्स आणि हॉटेल्समध्ये दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम व फेअरचे आयोजन केलेले असते. अनेक ठिकाणी लाईट शो, संगीत कार्यक्रम, रांगोळी प्रदर्शन आयोजित केले जाते.

सिंगापूर ः या ठिकाणी भारतीयांची मोठी संख्या असलेले एक 'मिनी इंडिया'च आहे. तिथे दिवाळीच्या काळात रंगवलेली घरे, खास अगरबत्त्यांच्या सुवासाची दरवळ या काळात अनुभवण्यास मिळते. येथील टेक्का मार्केट खास दिवाळीसाठी सजलेले असते. ठिकठिकाणी रांगोळीची व अन्य प्रकारची प्रदर्शने भरतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT