Latest

दिवाळी मध्ये हिंदी-मराठी चित्रपटांचा धमाका; बड्या बॅनरच्या चित्रपटांची मेजवानी

अमृता चौगुले

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : राज्य शासनाने दि. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे; पण दिवाळी सणाचे औचित्य साधून अनेक चित्रपटांचे पडदे हे नोव्हेंबरमध्येच उघडणार आहेत. दीड वर्षानंतर थिएटर उघडणार असल्याने टप्प्याटप्प्याने हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक नवीन चित्रपटांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

चित्रपटगृहे सुरू झाल्यावर हिंदीतील मोठमोठ्या रखडलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आता तारखा जाहीर केल्या आहेत. एक पडदा चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्स सुरू होणार असल्याने हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटगृहे सुरू होण्याची तारीख जाहीर होताच कंबर कसली. हिंदीतील छोट्या-मोठ्या चित्रपटांनीही अगदी पुढच्या वर्षीपर्यंतचे आपले प्रदर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यातुलनेत मराठी चित्रपटांची मोजकीच नावे जाहीर झाली आहेत.

नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमार, अजय देवगन यांची भूमिका असणारा 'सूर्यवंशी' हा हिंदीतला मोठा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे त्याच्यानंतरच्या आठवड्यातच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. डिसेंबर व जानेवारीअखेरीस हिंदीत 'जर्सी', 'पुष्पा' हा दाक्षिणात्य चित्रपट आणि 'गंगूबाई काठियावाडी', 'राधेश्याम', 'पृथ्वीराज चौहान', 'आरआरआर' असे चित्रपट एकामागोमाग एक प्रदर्शित होणार आहेत.

बड्या बॅनरच्या चित्रपटांची मेजवानी

'पांघरूण', 'मी वसंतराव', 'पावनखिंड', 'सरसेनापती हंबीरराव', 'दगडी चाळ 2', 'दे धक्का 2' असे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट चर्चेत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख लांबली होती; पण आता 22 ऑक्टोबरला चित्रपटगृहे सुरू होणार हे स्पष्ट झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मिळून सहा मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. याच काळात हिंदीत दहा ते बारा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT