कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुपटीचे आमिष दाखवून उद्योजक, व्यावसायिकांसह सरकारी कार्यालयांतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करणार्या 'त्या' बहुचर्चित कंपनीच्या 'टॉपटेन'मधील 'गोल्डन मॅन'ने गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी शाहूपुरी येथील स्वत:चे कार्यालय गुंडाळले. या प्रकारामुळे गुंतवणूकदारांत संतापाची लाट उसळली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी मंगळवारी सकाळी कंपनीच्या मुख्यालयात गर्दी केली होती.
अल्पकाळात दामदुपटीपेक्षा अधिक परतावा देण्याच्या आमिषाने कथित कंपनीचे शाहूपुरी परिसरात आलिशान कार्यालय थाटले होते. गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा, एजंटांसह मोठ्या रकमांची गुंतवणूक करणार्यांना आकर्षक गिफ्ट, परदेशवारी, आलिशान मोटारी व दुचाकी वाहन भेट स्वरूपात देऊन कंपनीने सात वर्षांत कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात पसारा वाढविला होता.
साडेचार हजार कोटींची गुंतवणूक
कंपनीच्या आमिषाला बळी पडून दीड लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांच्या रकमा गुंतविल्या आहेत. सुमारे साडेचार हजार कोटींवर उलाढालीचा टप्पा पार केलेल्या कंपनीचे आर्थिक चक्र बिघडल्याने गुंतवणूकदारांना तीन महिन्यांपासून परताव्यासह मुद्दलही देण्याचे बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही परतावा व मुद्दल देण्यास नकार मिळत असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. सोमवारी सकाळपासून गुंतवणूकदारांची शाहूपुरीतील मुख्य कार्यालयाकडे रीघ लागली. कंपनीच्या प्रमुखांसह 'टॉपटेन'मधील एजंटांशी संपर्क होत नसल्याने वादावादी होत होती.
गुंतवणूकदारांच्या बळावर मालामाल झालेल्या प्रमुख एजंटांनी मुख्यालयासह त्यांच्या स्वतंत्र कार्यालयांतूनही काढता पाय घेतल्याने गुंतवणूकदार संताप व्यक्त करत आहेत. यामध्ये 'गोल्डन मॅन' म्हणून परिचित असलेल्या आणि दरमहा लाखो रुपयांची कमाई करणार्या एजंटाने गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी शाहूपुरी येथील कार्यालय मंगळवारी सकाळीच बंद केले. कार्यालयातील फर्निचर, टेबल खुर्च्या, फायली, संगणक संच हलविल्याने दिवसभर तो चर्चेचा विषय बनला होता.