नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुंबईत 'डी गँग'च्या हस्तकांवर आरोपपत्र दाखल केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 'टेरर फंडिंग' प्रकरणातून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आणली आहे. मुंबई बॉम्बस्फोट, लोकल बॉम्बस्फोट, 26/11 नंतर पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम तसेच त्याचा पंटर छोटा शकील हे भारतावर दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट 'एनआयए'ने केला आहे. या कटाकडे 'एनआयए'ने आरोपपत्राद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
हवाला व्यवहाराच्या माध्यमातून दाऊदने पाकिस्तानातून 25 लाख रुपये दुबईत मागविले. नंतर हे पैसे व्हाया सुरत, मुंबईला दाखल झाले. हे पैसे आरिफ अबू बकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान आणि शब्बीर अबू बकर शेख यांना पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे दाऊद इब्राहिम व छोटा शकीलने गेल्या 4 वर्षांत भारतात 12 ते 13 कोटी रुपये पाठवले आहेत. सुरत येथील हवाला ऑपरेटरकडून 'एनआयए'ला याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हवाला ऑपरेटर कोण? ते सांगण्यात आलेले नाही. त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे दुबईतून भारतात आणण्यात रशीद मारफानी ऊर्फ रशीद भाई हा प्रमुख मध्यस्थ म्हणून काम करत होता.
दाऊद, छोटा शकील, त्याचा मेहुणा सलीम फ्रूट, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आरोपपत्रात आहेत. दाऊद, शकीलवगळता तिघांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातून व्हाया दुबई, व्हाया सुरत 25 लाख रुपये मुंबईत कसे पाठविण्यात आले त्याचा तपशीलही 'एनआयए'ने दिला आहे. या 25 लाखांतील 5 लाख रुपये शब्बीर याने स्वत:जवळ ठेवून घेतले होते आणि उर्वरित 20 लाख रुपये आरिफला दिले होते. हवालामार्गे आलेल्या रकमेतील 5 लाख रुपये 'एनआयए'च्या 9 मे 2022 रोजीच्या छाप्यात शब्बीरच्या घराची झडती घेतली असता आढळून आले होते. तब्बल 29 ठिकाणांवर 'एनआयए'ने छापे टाकले होते. हाजी अली, माहीम दर्ग्याचा सुहैल खंडवानी, समीर हिंगोरा, छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरैशी, दाऊदचा नातेवाईक गुड्डू पठाण, भिवंडीचा कय्युम शेख यांच्याविरोधातही चालू वर्षातील मे महिन्यात 'एनआयए'ने कारवाई केली होती.