Latest

तिसर्‍या दिवशीही पंचगंगेची पूर पातळी स्थिर

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर पुन्हा कमी झाला. दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने धरणातील पाणीसाठ्याच्या वाढीचा वेग कमी झाला. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. धरणातील विसर्ग कमी होऊ लागल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री एक इंचाने वाढलेली पंचगंगेची पाणी पातळी तिसर्‍या दिवशी शनिवारी दुपारी पुन्हा एक इंचाने कमी झाली.

पंचगंगेची पाणी पातळी दुपारनंतर 41 फूट 7 इंचावर होती. कोयना धरणातून विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू झाली आहे. यामुळे पंचगंगेची पाणी पातळी शनिवारीही जवळपास स्थिर राहिली. गेल्या तीन दिवसांपासून पंचगंगेची पातळी 41 फुटांवर असल्याने पंचगंगेच्या महापुराचा धोका कमी झालेला नाही. पावसाने अशीच उघडीप दिली तर उद्या (रविवार)पासून पाणी पातळी कमी होण्याचा वेग वाढेल, अशी शक्यता आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर केर्ली ते केर्लेदरम्यान पुराचे पाणी तिसर्‍या दिवशीही कायम होते. यामुळे या मार्गावरील वाहूतक केर्ली, गायमुख, वाघबीळ अशीच सुरू आहे. जिल्ह्यातील 71 बंधार्‍यांवर पाणी आहे. त्यामुळे त्यावरील वाहतूक बंदच आहे. काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत 108 मि.मी. पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. यामुळे धरणाचा आणखी एक दरवाजा सकाळी 10 वाजता बंद झाला. धरणाचे सध्या दोनच स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. त्यातून 4 हजार 456 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

SCROLL FOR NEXT